
छत्रपती संभाजीनगर ः आजच्या धावपळ, दगदग व ताण तणावाच्या काळात शरीर व मन तंदुरुस्त राहण्यासाठी क्रीडा क्षेत्रातील सहभाग विद्यार्थ्यांनी वाढवावा असे आवाहन मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या शारीरिक महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ शत्रुंजय कोटे यांनी केले.
राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून सरस्वती भुवन कला व वाणिज्य तसेच सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित क्रीडा जागृतीपर व्याख्यान प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विवेक मिरगणे हे होते. व्यासपीठावर सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सतीश पाटील, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन सदस्य प्रा डॉ गजानन सानप यांची उपस्थिती होती.

यावेळी प्रथम मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ सतीश पाटील यांनी अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्यासाठी क्रीडा क्षेत्रातील सहभागाची अनिवार्यता स्पष्ट केली. तर प्राचार्य डॉ विवेक मिरगणे यांनी जीवनात आनंदी राहण्यासाठी व खेळाडू वृत्ती वाढण्यासाठी क्रीडाक्षेत्र हे प्रबळ माध्यम असल्याचे स्पष्ट केले.
या कार्यक्रमास दोन्ही महाविद्यालयातील एनसीसी, एनएसएस व खेळाडू मिळून एकूण १५० जणांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा अन्सार अहमद यांनी केला. पाहुण्यांचा परिचय डॉ दयानंद कांबळे यांनी करून दिला. डॉ पूनम राठोड यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ दयानंद कांबळे, डॉ विशाल देशपांडे, डॉ पूनम राठोड, प्रा अहमद अन्सार तसेच क्रीडा विभागाच्या सर्व शिक्षकेतर सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.