
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते खेळाडूंचा सन्मान
पुणे : राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त पुण्यातील बालेवाडी येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील ३३१ पदकविजेत्यांना रोख पारितोषिकाने गौरविण्यात आले. यामध्ये तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबईच्या १४ पदकविजेत्या तायक्वांदोपटूंचा सन्मान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
पुण्यातील म्हाळुंगे, बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग सभागृहात महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आयोजित राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष
अजित पवार यांच्या हस्ते रोख पारितोषिकाने तायक्वांदोपटूंचा गौरव करण्यात आला. यावेळी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे हे उपस्थित होते.
उत्तराखंड येथे भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनद्वारा आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदक विजेते खेळाडू आहेत. शासनातर्फे या १४ खेळाडूंना बक्षिसांची रक्कम ७५ लाख ७० हजार रुपये देण्यात आली. सर्व खेळाडूंचे तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबईचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे, उपाध्यक्ष नीरज बोरसे, दुलीचंद मेश्राम, प्रवीण बोरसे, महासचिव मिलिंद पठारे, सचिव सुभाष पाटील, कोषाध्यक्ष व्यंकटेश कररा, कार्यकारीणी सदस्य अजित घारगे, सतीश खेमस्कर, प्रशिक्षक प्रवीण सोनकुल, अमोल तोडनकर, रॉबीन मेंन्झेस यांनी अभिनंदन केले. यामध्ये सुवर्णपदक विजेत्यांना ७ लाख रुपये, रौप्यपदक विजेत्यांना ५, तर ब्राँझपदक विजेत्यांना प्रत्येकी ३ लाखांचे बक्षिस देण्यात आले.
पदक विजेते खेळाडू
गौरव दत्तात्रय भट, मृणाली शशिकांत हरणेकर, नयन अविनाश बारगजे, अभिजीत सर्जेराव खोपडे, आयुष संदीप ओहळ, भारती रोहिदास मोरे, साक्षी सातेरी पाटील, शिवम ऋषिकेश भोसले, शिवानी लाला भिलारे, श्रेया नितीन जाधव, सिद्धी अतुल बेंडाळे, मनीषा सिद्धाराम गुट्टेदार, वंश प्रेमसिंग ठाकूर व वसुंधरा विनोदकुमार चेडे यांना सन्मानित करण्यात आले.