
सोलापूर ः शंकर शिवप्पा मस्कले स्मृती चषक जिल्हा बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय खेळाडू मानस गायकवाड, विशाल पटवर्धन, राष्ट्रीय खेळाडू चंद्रशेखर बसरगीकर, बार्शीचा शंकर साळुंके, स्वप्नील हदगळ, अकलूजचा उन्मेष राऊत, दत्तात्रय गोरे, आंतरराष्ट्रीय खेळाडू रिद्धी उपासे, स्वराली हातवळणे, सृष्टी गायकवाड, सान्वी गोरे, सृष्टी मुसळे या आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूंनी विजयी सलामी दिली.
सात रस्ता येथील इरण्णा उपलप मंगल कार्यालय येथे सुरु झालेल्या या स्पर्धेत १६ वर्षाखालील गटात मानांकित आदिनाथ हावळे, सानिध्य जमादार, रणवीर पवार, १२ वर्षाखालील गटात विवान दासरी, श्रेयस इंगळे, विवान कोंगारी, आयुष गायकवाड तसेच ८ वर्षाखालील गटात नमन रंगरेज, नियान कंदीकटला यांनी आकर्षक विजय मिळवीले. तसेच नागेश राजमाने, पृथ्वीराज मुकाने, स्वराली जाधव या उदयोन्मुख खेळाडूंनी चांगली कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
ग्रँडमास्टर चेस अकॅडमी व सोलापूर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने होत असलेल्या या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत ३४ आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूंसह सोलापूर शहरासह करमाळा, पंढरपुर, दक्षिण सोलापूर, माळशिरस, मंगळवेढा, बार्शी, अक्कलकोट, माढा आदी तालुक्यातील २५० खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
स्पर्धेचे उद्घाटन प्रायोजक कस्तुराबाई शंकर मस्कले व ग्रँडमास्टर चेस अकॅडमीचे विद्या मस्कले यांच्यातील प्रदर्शनीय लढतीने करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव व आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड, ग्रँडमास्टर चेस अकॅडमीचे सचिव गणेश मस्कले, आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त अतुल कुलकर्णी, विद्यापीठ खेळाडू संतोष पाटील, सरस्वती झंपले, शकुंतला माने, दिगंबर मस्के, महादेव भोसले, उज्वला नाईकवाडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय पंच संतोष पाटील यांनी केले तर प्रास्ताविक सुमुख गायकवाड यांनी केले. स्पर्धेत प्रमुख पंच म्हणून वरिष्ठ राष्ट्रीय पंच उदय वगरे तर सहाय्यक वरिष्ठ राष्ट्रीय पंच रोहिणी तुम्मा, प्रज्वल कोरे, पृथ्वीराज देशमुख, भरत वडीशेरला, गौरव माने, अभिषेक राठोड आदी काम पाहत आहेत.