 
            ३ व ४ सप्टेंबर रोजी आयोजन
मुंबई ः केंद्र सरकार युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय अंतर्गत मुंबईतील भारतीय क्रीडा प्राधिकरण राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र (एनसीओई) येथे ३ व ४ सप्टेंबर रोजी कुस्ती निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे.
कुस्तीपटूंनी या निवड चाचणीत सहभागी होताना ३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत चाचणी ठिकाणी हजर राहणे आवश्यक आहे. ही निवड चाचणी साई श्री अटल बिहारी वाजपेयी प्रादेशिक केंद्र, आकुर्ली रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई – ४००१०१ या ठिकाणी होणार आहे.
निवड चाचणी फ्रीस्टाईल (पुरुष) व महिला (फ्रीस्टाइल) अशा दोन गटात होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून (चाचणीच्या तारखेनुसार) खालील निकष पूर्ण करणारे कुस्तीगीर सहभागी होण्यास पात्र आहेत. राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा / राष्ट्रीय रँकिंग स्पर्धांमध्ये ५ व्या स्थानापर्यंत स्थान मिळवलेले मान्यताप्राप्त राज्य अजिंक्यपद स्पर्धांचे सुवर्णपदक विजेते आणि शॉर्टलिस्ट केलेले खेळाडूंना वय पडताळणी चाचणीतून जावे लागेल.
चाचण्या दरम्यान सहभागींनी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था स्वतः करावी लागेल. चाचण्यांच्या वेळी सर्व कागदपत्रे मूळ स्वरूपात सादर करावी लागतील. त्यात प्रामुख्याने जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, क्रीडा कामगिरी प्रमाणपत्रे, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे, पासपोर्ट आकाराचे फोटो – २ प्रती यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी राज सिंग, मुख्य कुस्ती प्रशिक्षक (९३०६८४८१०६), शिल्पी शेओरन, सहाय्यक कुस्ती प्रशिक्षक (९९९६२९२३००) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



