
पुरुषांच्या सांघिक अजिंक्यपदाबरोबरच वैयक्तिक ८ पदकांची कमाई
ठाणे ः छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच पार पडलेल्या योनेक्स-सनराईज नंदू नाटेकर स्मृती महाराष्ट्र सिनियर स्टेट बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध करत एक सुवर्ण, दोन रौप्य आणि पाच कांस्य अशी एकूण आठ पदके पटकावत राज्यातील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धेत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.
सर्वप्रथम झालेल्या सांघिक स्पर्धेत प्रथमेश कुलकर्णीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ठाण्याच्या संघात अनुभवी तसेच तरुण खेळाडूचा समावेश होता. सर्वप्रथम ठाण्याने नाशिक संघाचा अटीतटीच्या लढतीत ३-२ असा निसटता पराभव केला. त्यानंतर सातारा, नागपूर व शेवटी अंतिम फेरीत महामुंबई संघाचाही अनुक्रमे ३-० असा धुव्वा उडवून ठाणे संघानी अजिंक्य पदावर आपली मोहोर उमटवली. या संघाबरोबर प्रशिक्षक म्हणून मयुर घाटणेकर व मितेश हजीरनीस यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
वैयक्तिक स्पर्धेत ठाणेकर चमकले
विशेष म्हणजे, या प्रतिष्ठेच्या वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत तब्बल १६ पैकी ११ खेळाडू ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचेच होते आणि ही ठाण्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली. अंतिम फेरीत खेळलेले सामने अतिशय रोमहर्षक लढतींनी रंगले व ठाण्याच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी साकारत विजय मिळवला.
दीप रांभिया व रितिका ठाकूर यांनी मिश्र दुहेरीत सुवर्णपदक पटकावत ठाण्याचा झेंडा उंचावला. या जोडीने उपांत्यपूर्व फेरीत ठाण्याच्या इअन लोपेस व अनामिका सिंह यांना २१-१०, २१-१४ ने पराभूत केले. उपांत्य फेरीत ठाण्याच्याच अमन नौशाद व सोनाली मिर्खेलकर यांना १७-२१, २१-१५, २१-१८ असा पराभव देत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात पुन्हा ठाण्याच्या अमन एफ एस व अनघा करंदीकर यांच्याशी सामना झाला. तीन गेम्सपर्यंत रंगलेल्या या पॉवरपॅक्ट लढतीत दीप-रितिका जोडीने ३०-२९, २१-२३, २१-१३ असा रोमांचक विजय मिळवत सुवर्णपदकाची कमाई केली.
पुरुष एकेरीत ठाण्याचा युवा खेळाडू सर्वेश यादव याने उपांत्यपूर्व फेरीत नागेश चामले याचा १९-२१, २१-१८, २१-८ असा पराभव केला. उपांत्य फेरीत त्याने हिमांशु देसाई याला २१-१२, २१-१० असे सहज हरवले. मात्र अंतिम सामन्यात त्याला संकल्प
गुराला याच्याकडून २१-१६, २१-१३ असा पराभव पत्करावा लागला आणि त्याने रौप्य पदकाची कमाई केली.
महिला दुहेरीत इशिता कोरगावकर व वृध्दी चाफेकर यांनी कांस्य पदक पटकावले, तसेच मिश्र दुहेरीत अमन नौशाद व सोनाली मिर्खेलकर यांनी कांस्याची कमाई केली. याशिवाय इतर खेळाडूंनीही उपांत्य फेरी गाठत ठाण्याची ताकद ठळकपणे दाखवून दिली.
या शानदार यशामुळे ठाणे बॅडमिंटन अकॅडमीने महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या व प्रतिष्ठेच्या स्पर्धेत ८ पदकांची ऐतिहासिक कमाई करून ठाण्याचे बॅडमिंटनमधील वर्चस्व आणखी ठसवले आहे. सर्व विजेते खेळाडू ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियम मधील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल येथे राबविण्यात येणाऱ्या ‘सय्यद मोदी कोचिंग प्रशिक्षण योजने’अंतर्गत घडवले गेलेले असून, या योजनेतून घडलेले खेळाडू राज्यस्तरावर सातत्याने यशाची शिखरे सर करत आहेत.
मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड म्हणाले, “महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित सिनियर स्टेट स्पर्धेत खेळाडूंनी दाखवलेली सातत्यपूर्ण कामगिरी ही ठाणेकरांच्या मेहनतीचे प्रतिक आहे. क्वार्टर फायनलमध्ये ११ ठाणेकर खेळाडूंची उपस्थिती आणि ८ पदकांची कमाई ही ठाण्यातील बॅडमिंटनची ताकद स्पष्ट करणारी आहे.”
ठाणे महापालिकेच्या क्रीडा उपायुक्त मीनल पालांडे यांनी खेळाडूंचे अभिनंदन करत सांगितले, “सीनियर स्तरावरील ही कामगिरी ठाणे बॅडमिंटनच्या शक्तीचे द्योतक आहे. सय्यद मोदी कोचिंग योजनेतून घडलेले आमचे खेळाडू भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच ठसा उमटवतील, असा आम्हाला विश्वास आहे.”