
नवी दिल्ली ः स्टार वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा एकेकाळी भारतीय संघातील एक महत्त्वाचा दुवा होता. पण नंतर तो हळूहळू आपली लय गमावून बसला आणि संघाबाहेर राहिला. गेल्या तीन वर्षांपासून तो भारतीय संघात स्थान मिळवू शकला नाही. त्याने २०२२ मध्ये इंग्लंडविरुद्ध भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. भुवी सध्या यूपी टी २० लीग स्पर्धेतमध्ये खेळत असून तो लखनऊ फाल्कन्स संघासाठी कर्णधारपदाची जबाबदारी देखील सांभाळत आहे.
जागरण दैनिकाशी खास संवाद साधताना भुवनेश्वर कुमार म्हणाला की, तुमची कामगिरी महत्त्वाची आहे. जर कोणी सातत्याने चांगले क्रिकेट खेळत असेल तर त्याला अजिबात दुर्लक्ष करता येणार नाही. जरी तुमची संघात निवड होत नसली तरी तुमचे १०० टक्के देण्यावर लक्ष केंद्रित करा. बाकी सर्व काही निवडकर्त्यांवर अवलंबून असेल.
भुवनेश्वर कुमारला विचारण्यात आले की चाहते त्याला पुन्हा भारतीय संघाच्या जर्सीमध्ये पाहण्याची अपेक्षा करू शकतात का, तेव्हा तो म्हणाला की फक्त निवडकर्तेच याचे उत्तर देऊ शकतात. माझे काम मैदानावर माझे १०० टक्के देणे आहे. यूपी लीगनंतर मला उत्तर प्रदेशकडून मुश्ताक अली, रणजी किंवा एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळते. मी तिथे माझे सर्वोत्तम प्रदर्शन करेन. याशिवाय, भुवी म्हणाला की त्याने अद्याप निवृत्तीचा विचार केलेला नाही, जोपर्यंत तो तंदुरुस्त आहे तोपर्यंत तो खेळत राहील.
एकदिवसीय सामन्यांमध्ये १४१ बळी
भुवनेश्वर कुमारने २०१२ मध्ये भारतीय संघासाठी एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. त्यानंतर, त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात, तो संघाच्या गोलंदाजी हल्ल्यात एक महत्त्वाचा दुवा राहिला. त्याने कसोटीत ६३ बळी, एकदिवसीय सामन्यांमध्ये १४१ बळी आणि टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९० बळी घेतले आहेत. सध्या तो तिन्ही फॉरमॅटमधून बाहेर आहे.