सोलापूर ः सोलापूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनच्या सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून १३ वर्षांखालील मुले व मुलींच्या आंतर जिल्हा राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धा १० सप्टेंबरपासून येथे आयोजित केल्याची माहिती सोलापूर शहर व जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष के डी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज केगाव व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ येथे ही स्पर्धा १० ते १५ सप्टेंबर या कालावधीत आयोजित केली आहे. या स्पर्धेत राज्यातील मुले व मुलींचे ६० संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी मुली व मुले असे एकूण ७०० खेळाडू, ऑफिशियल कोचेस व महाराष्ट्र असोसिएशनचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. या स्पर्धेमधून महाराष्ट्राचा मुले व मुलींचा संघ निवडण्यात येणार आहे. हा संघ उत्तराखंड येथे ४ ते १० ऑक्टोबर २०२५ होणाऱ्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी सहभागी होणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन खासदार प्रणिती शिंदे, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार प्रकाश यलगुलवार व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. या स्पर्धेच्या उद्घाटनानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव ते राज्याभिषेक त्याचबरोबर महाराष्ट्रातील लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
या पत्रकार परिषदेस जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे सचिव साकीब शेख, दिनेश सारंगी, मुकीम खान, तबिश जमाल, सीमा यलगुलवार, नावेद मुनशी आदी उपस्थित होते.