
बीड जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेचा समारोप
बीड ः बीड जिल्हा क्रीडा कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद बीड व तायक्वांदो असोसिएशन ऑफ बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेच्या समारोप प्रसंगी पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या हस्ते राष्ट्रीय तायक्वांदो खेळाडूंसह गुणवंतांना गौरविण्यात आले.
जिल्हा क्रीडा संकुल बीड येथे दोन दिवसीय जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा पार पडली. जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेचा समारोप गुरुवारी करण्यात आला. या प्रसंगी जागतिक तायक्वांदो दिनाचे औचित्य साधून स्पर्धेतील विजेते खेळाडू, राज्य -राष्ट्रीय खेळाडू, क्रीडा पुरस्कार विजेते खेळाडू, प्रशिक्षक व राष्ट्रीय पंचांना जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा प्रमुख क्रीडा अधिकारी अनिकेत काळे, क्रीडा संघटक प्रा दिनकर थोरात, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे यांच्या उपस्थितीत हा समारोप समारंभ पार पडला.
या कार्यक्रमासाठी क्रीडा अधिकारी कालिदास होसुरकर, जितू आराक, योगेश कारंडे, जया बारगजे यांच्यासह तायक्वांदो खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेत्या जया बारगजे, बन्सी राऊत, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेती नयन बारगजे हिच्यासह राष्ट्रीय खेळाडू ओमकार परदेशी, यशस्वी चव्हाण, कार्तिकी मिसाळ, श्रवण तांबारे, पारस गुरुखुदे, प्रणवकुमार शिरसाठ, देवेंद्र जोशी, राष्ट्रीय पंच शेख अनिस, ऋत्विक तांदळे, रंजीत काकडे, बाळासाहेब आंधळे, शकील शेख ,बालाजी कराड या पंचांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेचे नियोजन व शिस्तबद्ध आयोजनासाठी जिल्हा क्रीडा कार्यालय, बीड व तायक्वांदो प्रात्यक्षिकांचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी कौतुक केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.