
४ ऑक्टोबरपासून स्पर्धेला प्रारंभ, प्रदीप राठोड, संजय डोंगरे यांची माहिती
छत्रपती संभाजीनगर ः वेगवान गोलंदाज कै शेख हबीब यांच्या मित्रांनी एकत्रित येऊन शेख हबीब स्मृती टी २० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा ४ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत शहरातील दोन क्रिकेट मैदानावर होणार आहे, अशी माहिती संयोजक प्रदीप राठोड आणि संजय डोंगरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
शेख हबीब स्मृती टी २० क्रिकेट स्पर्धेविषयी माहिती सांगतान प्रदीप राठोड म्हणाले की, शेख हबीब हा केवळ उत्तम क्रिकेटपटूच नव्हता एक उत्कृष्ट व्यक्ती देखील होता. सामाजिक कार्यातही शेख हबीब स्वतः झोकून देत काम करीत असे. शेख हबीब हा सर्वांच्याच परिचयाचा होता. साहजिकच त्याच्या कार्याची आठवण कायम राहावी या हेतूने शेख हबीब स्मृती टी २० लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
अड. संजय डोंगरे यांनी या स्पर्धेविषयी माहिती सांगताना सांगितले की, गरवारे क्रिकेट स्टेडियम आणि रामपूर क्रिकेट मैदान या दोन ठिकाणी या स्पर्धेतील सामने खेळवण्यात येणार आहेत. या स्पर्धेत एकूण १२ संघांचा सहभाग असणार आहे. या संघांना दोन गटात विभागण्यात येईल. प्रत्येक संघाला या स्पर्धेत चार साखळी सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर उपांत्य व अंतिम सामना होईल.
२ लाखांचे पारितोषिक
या स्पर्धेतील विजेत्या संघाला २ लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. उपविजेता संघ दीड लाख रुपये रोख रकमेचा मानकरी ठरेल. याशिवाय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱया खेळाडूंना रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. मालिकावीर खेळाडूस १५ हजार रुपये, उत्कृष्ट फलंदाज ११ हजार रुपये, गोलंदाज ११ हजार रुपये अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रदीप राठोड व संजय डोंगरे यांनी यावेळी दिली.
या स्पर्धेतील सामने हे दिवसा खेळवण्यात येणार आहेत. साहजिकच ही स्पर्धा व्हॉइट ड्रेस व रेड बॉलवर खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेला सर्वांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे प्रदीप राठोड व संजय डोंगरे यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी प्रदीप राठोड (९८५००४७१०७), संजय डोंगरे (९८२३५५५३३३), विजय अडलाकोंडा (९५९५३०१००१), किरण भोळे (७४९८३२५९९०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.