
मुंबई ः बाळ गोपाळ (अभिलाषा) गणेशोत्सव मंडळ-काळाचौकी व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे माजी नगरपाल डॉ जगन्नाथराव हेगडे पुरस्कृत गणाधीश चषक राज्य स्तरीय १८ वर्षाखालील विनाशुल्क कॅरम स्पर्धेत सार्थक केरकर विजेता ठरला.
डावाच्या मध्यापर्यंत ६-६ अशा बरोबरीत रंगलेल्या अंतिम फेरीमध्ये निर्णायक क्षणी अचूक फटके मारून सार्थक केरकरने राष्ट्रीय ख्यातीची ज्युनियर कॅरमपटू सिमरन शिंदेचा १२-६ गुणांनी पराभव केला.
तत्पूर्वी, झालेले दोन्ही उपांत्य फेरीचे सामने संपूर्ण डावात समान गुणांवर थबकले. त्यामुळे टायब्रेकरच्या निर्णायक बोर्डमध्ये सिमरन शिंदेने ध्रुव भालेरावचे आव्हान तर सार्थक केरकरने कौस्तुभ जागुष्टेचे आव्हान संपुष्टात आणून अंतिम फेरी गाठली.
या स्पर्धेमध्ये उपांत्य उपविजेते ध्रुव भालेराव, कौस्तुभ जागुष्टे तर उपांत्यपूर्व उपविजेते सारा देवन, प्रसाद माने, सावंतवाडीचा भारत सावंत, जैतापुरचा आर्यन राऊत यांनी पुरस्कार मिळविला.
माजी नगरपाल डॉ जगन्नाथराव हेगडे, आयडियलचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते, लायन हुजेफा घडियाली, क्रीडाप्रेमी निवृत्ती देसाई, अण्णा शिर्सेकर, नंदकुमार चिले, दिलीप वरेकर, मुख्याध्यापक महेंद्र पाटील, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त लीलाधर चव्हाण आदी मंडळी बक्षीस वितरण प्रसंगी उपस्थित होती.