
प्रबुद्धचंद्र झपके यांची माहिती
सोलापूर ः सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, स्वातंत्र्यसेनानी गुरुवर्य सी व्ही तथा बापूसाहेब झपके यांच्या ४४व्या स्मृती समारोह विविध कार्यक्रमांनी होत आहे. यात १२ ते १४ सप्टेंबर दरम्यान पुरूषांच्या निमंत्रित राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा होणार आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा प्रबुद्धचंद्र झपके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेस संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत, प्राचार्य अमोल गायकवाड, सांगोला शहर व तालुका बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव प्रशांत मस्के उपस्थित होते.
या स्पर्धेचे उद्घाटन पदवीधर मतदार संघ, पुणे विभागाचे आमदार अरुण लाड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सांगोला विधानसभा सदस्य आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांचे अध्यक्षतेखाली व क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी दत्तात्रय वरकड यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सकाळी १० वाजता सांगोला विद्यामंदिर येथे होईल.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर यांच्या हस्ते व विश्वविजेत्या भारतीय महिला खो-खो संघाची कर्णधार प्रियंका इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी उद्योगपती सिद्धार्थ झपके, विलास क्षीरसागर, सुहास होनराव, ज्ञानेश्वर तेली, नागेश तेली, श्रीकांत देशपांडे, मंगेश म्हमाणे, रत्नाकर ठोंबरे यांची उपस्थिती असणार आहे.