
दुबई ः आशिया कप टी २० क्रिकेट स्पर्धेच्या भारतीय मोहिमेला बुधवारी सुरुवात होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने पाकिस्तान संघाला कडक इशारा दिला आहे. पाकिस्तान विरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यात भारतीय संघ आक्रमकवृत्तीपासून अजिबात मागे हटणार नाही अशा शब्दात सूर्यकुमार याने ठणकावून सांगितले.
भारताची मोहीम बुधवारपासून म्हणजेच १० सप्टेंबरपासून सुरू होईल. भारतीय संघ ग्रुप-अ मध्ये त्यांच्या पहिल्या सामन्यात यूएई संघाचा सामना करेल. त्यानंतर, रविवार, १४ सप्टेंबर रोजी भारतीय संघ पाकिस्तानशी सामना करणार आहे. या सामन्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.
आक्रमकता खूप महत्वाची आहे
स्पर्धेच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमार म्हणाला की, मैदानावर आक्रमकता नेहमीच असते आणि जिंकणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्हाला जिंकायचे असेल तर आक्रमकतेशिवाय तुम्ही राहू शकत नाही. सूर्यकुमार म्हणाला की, त्यांच्या संघातील वातावरण सकारात्मक आहे आणि खेळाडूंनी कठोर तयारी केली आहे. आम्ही काही चांगले सराव सत्रे केली आहेत. आशिया कपमधील सर्वोत्तम संघांविरुद्ध खेळणे हे एक मोठे आव्हान असेल.
खेळाडूंना विशेष निर्देश नाहीत – आगा
सूर्यकुमार यादवच्या आक्रमकतेबद्दल बोलताना पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा म्हणाले की, जर कोणाला आक्रमक व्हायचे असेल तर तो त्यांचा निर्णय आहे. त्यांनी सांगितले की ते त्यांच्या वतीने कोणत्याही खेळाडूला कोणतेही विशेष निर्देश देत नाहीत.
टीम इंडिया प्रयोग करणार नाही
या स्पर्धेत युएईला अंडरडॉग मानले जात आहे, परंतु सूर्यकुमार याने यजमान संघाला हलके घेण्यास नकार दिला. त्यांनी सांगितले की युएई रोमांचक क्रिकेट खेळत आहे आणि अलीकडेच ते टी-२० त्रिकोणी मालिकेत काही सामने जिंकण्याच्या जवळ पोहोचले आहेत. आशा आहे की ते आशिया कपमध्येही चांगली कामगिरी करतील.
सूर्याला विचारण्यात आले की, भारत सुरुवातीच्या सामन्यात कोणत्याही प्रकारचे प्रयोग करेल का, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितले की असे होणार नाही. तो म्हणाला की जेव्हा तुम्ही कोणत्याही स्वरूपात खेळता तेव्हा तुम्हाला तुमच्या तयारीची पातळी माहित असली पाहिजे. जर एखादी गोष्ट आपल्याला निकाल देत असेल तर ती का बदलायची? काम करणारी पद्धत बदलण्याची गरज नाही.