
धनगरवाडी गावाचे लाडके आदर्श शिक्षक जगन्नाथ शेळके गुरुजी (अण्णा) यांचा अभिष्टचिंतन सोहळा ५ सप्टेंबर २०२५ रोजी धनगरवाडी येथे श्री श्री गणेशोत्सव उत्सव प्रसंगी आणि शिक्षक दिनाचा दुग्ध शर्करा योग मिळून येऊन स्नेही सहृदयांच्या स्नेहल उपस्थितीत सपत्नीक साजरा करण्यात आला.
एखाद्या व्यक्तीने गावासाठी किती योगदान द्यावे आणि त्याबद्दल त्यांचा पूर्ण सन्मान वा जाणीव ठेवून गावाने त्यांच्यावर किती जीव लावावा हे या सोहळ्यातून अनुभवत असताना भावनिक वातावरण तयार झाले.
स्वतःच्या अजातशत्रू वागण्याने जनसामान्यांकडून अभूतपूर्व असे प्रेम मिळणारे आणि त्याचा कधीही गर्व झाला नाही किंवा आकर्षणही वाटू न देणारी…थोडक्यात अहंकारावर पूर्ण विजय मिळवलेली व्यक्ती म्हणजे जगन्नाथ दादाभाऊ शेळके गुरुजी. कधीही, कसलाही मोठेपणा नाही, बडेजाव नाही. सर्व गावचे गावकरी, सगे सोयरे व मित्रपरिवार यांच्या समृद्धीची मागणी आपल्या अमोघ वाणीतून गावातील विविध धार्मिक उत्सव, पोथी-पारायण, विविध सण-समारंभ यावेळी करताना सर्वांनी जी व्यक्ती गेली अनेक वर्ष अनुभवली त्या गुरुजींबद्दल ऋणानुभाव मनात बाळगून गुरुजी नको म्हणत असताना गावातील सर्व तरुण-ज्येष्ठ ग्रामस्थांनी एकत्र येऊन त्यांचा ७५ वा अभिष्टचिंतन सोहळा थाटामाटात एखाद्या उत्सवाच्या स्वरूपात साजरा केला.
ज्येष्ठ बंधु आदर्श शिक्षक कै. सुखदेव शेळके गुरुजी यांच्यानंतर इंग्रजी विषयाचे गाढे अभ्यासक कै. सुरेश (अप्पा) शेळके सर आणि प्रेमळ असे आबा अर्थात ज्ञानेश्वर शेळके सर या तीनही भावंडांची गावाला आणि कुटुंबाला भासत असलेली उणीव भरून काढत आयुष्याचे शतक पार करण्याची ऊर्जा श्री बाप्पा विघ्नहर्ता आपणास या प्रसंगी दिली हे निश्चित.
ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या औपचारिक कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने राजकीय, शैक्षणिक, सामाजिक तसेच वारकरी संप्रदायातील विविध मान्यवर उपस्थित होते.
गावातील तसेच आमंत्रित पाहुण्यांनी, गावातील तरुण-तरुणी यांनी व्यक्त केलेली भावनिक मनोगते या कार्यक्रमाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेली.
देवऋण, ऋषिरूण, मातृ-पितृऋण, आणि समाजऋण हे ऋण फेडण्यापेक्षा ते जाणणे, मानणे आणि त्या ऋणात राहणे अधिक श्रेयस्कर…कारण त्यामुळे ऋणानुबंध पिढ्यानपिढ्या दृढ होतात अशी आपली संस्कृती सांगते….हे जाणणाऱ्या आणि हे जाणून गुरुजींचा (अण्णांचा) ऋणनिर्देश सोहळा संपन्न करणाऱ्या सर्व युवा सहकाऱ्यांचे खास कौतुक करावे तेवढे थोडे !!
ऋणनिर्देश सोहळ्यात गुरुजींबद्दल सर्वजण भरभरून बोलले… अधिक काय लिहिणे…ज्यांनी ज्यांनी आपापल्या परीने कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हातभार लावला…व्यवस्थापनाची जबाबदारी समर्थपणे पेलली अशा सर्व दृश्य-अदृश्य साथ देणाऱ्या हातांना धन्यवाद.
- गणेश शेळके, धनगरवाडी, पुणे.