
दुबई ः भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने आशिया कप टी २० क्रिकेट स्पर्धेच्या ग्रुप अ सामन्यात संयुक्त अरब अमिराती संघाविरुद्ध दणदणीत विजय मिळवल्यानंतर आपल्या गोलंदाजांच्या कामगिरीचे कौतुक केले. मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याने यजमान संघाच्या कमकुवत फलंदाजीला उध्वस्त करून चार विकेट घेतल्या आणि त्यामुळे भारताला नऊ विकेट्सने सहज विजय मिळवून त्यांच्या मोहिमेची सुरुवात करण्यास मदत झाली.
सुर्यकुमारने सामन्यानंतर सांगितले की मुलांनी शानदार कामगिरी केली. आम्हाला पूर्ण उर्जेने मैदानावर जायचे होते आणि फलंदाजीतही तेच दिसून आले. विकेट चांगली होती. पण इथेही खूप गरमी आहे. फिरकी गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. कुलदीप यादवने शानदार कामगिरी केली. जसप्रीत बुमराह, शिवम दुबे आणि हार्दिक पंड्यानेही चांगली गोलंदाजी केली. कुलदीपने सामन्यात एकूण चार विकेट्स घेतल्या आणि शिवमने तीन विकेट घेतल्या. त्याच्या दमदार कामगिरीमुळे कुलदीपला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
अभिषेक शर्माची आक्रमक फलंदाजी
भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माने यूएईविरुद्ध १६ चेंडूत ३० धावा काढल्या, ज्यामध्ये दोन चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याचे कौतुक केले आणि म्हटले की तो सध्या या फॉरमॅटचा नंबर-१ फलंदाज आहे आणि त्याचे कारण त्याची आक्रमक शैली आहे. तो २०० धावांचा पाठलाग असो वा ५० धावांचा, तो सूर निश्चित करतो. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. टी २० आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महान सामना १४ सप्टेंबर रोजी खेळला जाईल.
खराब फलंदाजी – वसीम
यूएईचा कर्णधार मोहम्मद वसीम म्हणाला की आम्ही फलंदाजीत चांगली सुरुवात केली पण त्यानंतर आम्ही सतत विकेट गमावल्या आणि हेच आमच्या पराभवाचे कारण होते. भारत एक मजबूत संघ आहे आणि त्यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्यांनी त्यांची रणनीती पूर्णपणे अंमलात आणली. आम्ही या चुकांमधून शिकण्याचा आणि परतण्याचा प्रयत्न करू.