
डी ११ टी २० लीग क्रिकेट ः चेतन मुंढे, योगेश लिंगायत सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः डी स्पोर्ट्स प्रेझेंट्स डी ११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात रायझिंग स्टार संघाने व्हिजन क्रिकेट अकादमी संघाचा चुरशीच्या लढतीत २० धावांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात इथिकल क्रिकेट अकादमी संघाने पूरब जैस्वाल संघावर सहा विकेट राखून मोठा विजय संपादन केला. या लढतींमध्ये चेतन मुंढे आणि योगेश लिंगायत यांनी सामनावीर पुरस्कार पटकावला.

रुफीट क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा खेळवण्यात येत आहे. पहिल्या सामन्यात रायझिंग स्टार संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकात आठ बाद १४७ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. या धावसंख्येच्या प्रत्युत्तरात व्हिजन क्रिकेट अकादमी संघ १९.५ षटकात १२७ धावांत सर्वबाद झाला. रायझिंग स्टार संघाने २० धावांनी विजय साकारला. चेतन मुंढे हा सामनावीर ठरला.
कमी धावसंख्येच्या या सामन्यात गौरव लोखंडे याने २७ चेंडूत ३३ धावा काढल्या. त्याने तीन चौकार मारले. अक्षय गिरेवाड याने ३१ धावा फटकावल्या. त्यात त्याने तीन चौकार व एक षटकार मारला. पियुष अष्टेकर याने २७ धावांची आक्रमक खेळी करताना एक चौकार व एक षटकार मारला.
गोलंदाजीत चेतन मुंढे याने प्रभावी मारा करत १९ धावांत चार गडी बाद करुन संघाला विजय मिळवून दिला. सुभाष तिडके याने १४ धावांत दोन तर कृष्णा काकडे याने २५ धावांत दोन गडी बाद केले.
पूरब जैस्वाल संघ पराभूत
दुसऱया सामन्यात इथिकल क्रिकेट अकादमी संघाने पूरब जैस्वाल संघावर सहा गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात पूरब जैस्वाल संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत १९ षटकात सर्वबाद १३१ असे माफक लक्ष्य उभे केले. इथिकल क्रिकेट अकादमीच्या सलामी जोडीने शानदार फलंदाजी करुन संघाला जोरदार सुरुवात करुन दिली. त्यानंतर इथिकल अकादमी संघाचा विजय सोपा झाला.

इथिकल संघाने १९.२ षटकात चार बाद १३२ धावा फटकावत विजय साकारला. या सामन्यात नदीम अन्सारी याने पाच चौकार व दोन षटकारांसह ४० धावांची आक्रमक खेळी केली. वसीम खान याने ३२ धावा काढल्या. त्याने दोन षटकार मारले. गोलंदाजीत योगेश लिंगायत याने १८ धावांत चार विकेट घेऊन सामना गाजवला. त्याच्या प्रभावी गोलंदाजीने इथिकल संघाने सहजपणे सामना जिंकला. मयूर वैष्णव याने २० धावांत तीन तर सलीम पठाण याने २६ धावांत दोन गडी बाद केले.