जलतरण स्पर्धेत ‘एमआयटी’च्या खेळाडूंचे यश

  • By admin
  • September 12, 2025
  • 0
  • 14 Views
Spread the love

पुणे: लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय आंतरशालेय जलतरण स्पर्धेत येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठातील, डाॅ विश्वनाथ कराड एमआयटी क्रीडा अकादमीच्या खेळाडूंनी सुवर्ण कामगिरी करत विभागीय प्रतिनिधित्वासाठी निवड मिळविली आहे.

स्पर्धेच्या १९ वर्षाखालील मुलींमध्ये सुहानी कमलेश काळभोर, देवयानी शिवाजी ननावरे व भार्गवी ओंकार सोमण या तिघींनी सुवर्णपदक तर १९ वर्षांखालील मुलांमध्ये ख्यात बहेकर व १७ वर्षाखालील वेदांत इंगळे यांनी सुवर्णपदक पटकावत दैदिप्यमान कामगिरी केली आहे.

क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे, श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी (ता. आंबेगाव) यांच्या संयुक्त विद्यामाने न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी येथे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पुणे जिल्ह्यातील एकूण ५४ शाळांमधील ५७७ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.

१९ वर्षांखालील मुलींमध्ये सुहानी हिने १०० मीटर फ्रीस्टाइल- सुवर्णपदक, २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक-रौप्य पदक, ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक सुवर्णपदक पटकावले. देवयानीने १०० मीटर बॅकस्ट्रोक- सुवर्णपदक, ५० मीटर फ्रीस्टाइल-कांस्यपदक, ४०० मीटर फ्रीस्टाइल -कांस्यपदक, तर भार्गवीने ४०० मीटर फ्रीस्टाइल – सुवर्णपदक, ५० मीटर फ्रीस्टाइल – रौप्य पदक, ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक – रौप्य पदक पटकावले. या तिन्ही विद्यार्थिनींची विभागीय प्रतिनिधित्वासाठी निवड झाली आहे.

१९ वर्षांखालील मुलांमध्येही उल्लेखनीय कौशल्य आणि खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन करताना ख्यात याने २०० मीटर फ्रीस्टाइल- सुवर्णपदक, ४०० मीटर फ्रीस्टाइल-सुवर्णपदक, १५०० मीटर फ्रीस्टाइल – सुवर्णपदक पटकावले. तर १७ वर्षाखालील स्पर्धेत वेदांतने ४०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये रौप्यपदक पटकावले या तिन्ही विद्यार्थ्यांची देखील विभागीय प्रतिनिधित्वासाठी निवड करण्यात आली आहे.

सर्व खेळाडू हे एमआयटी एडीटी विद्यापीठ शिक्षण संकुलातील एमआयटी व्हीजीएस सीबीएसई स्कूलचे विद्यार्थी आहेत. त्यांना जलतरण प्रशिक्षक निवास साळुंखे, जलतरण विभाग प्रमुख सी प्रकाश, सिद्धार्थ गर्ग यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या कामगिरीनंतर माईर्स शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष डाॅ विश्वनाथ कराड, विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डाॅ मंगेश कराड, माईर्स शिक्षण समूहाच्या ट्रस्टी प्रा स्वाती चाटे-कराड, क्रीडा विभाग प्रमुख शिवछत्रपती पुरस्कार विजेते पद्माकर फड, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डाॅ सुराज भोयार, एमआयटी व्हीजीएसच्या प्राचार्या अरुणा अँथनी यांनी सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *