
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने ऑस्ट्रेलियाचे अनुभवी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षक व तज्ज्ञ शॉन विल्यम्स यांना एमसीएच्या डायरेक्टर ऑफ क्रिकेट पदावर नियुक्त केले आहे. शॉन विल्यम्स हे क्रिकेट क्षेत्रातील जागतिक स्तरावरील अत्यंत प्रतिभावान व्यक्तिमत्व असून, त्यांनी श्रीलंका आणि बांगलादेश या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचेही प्रशिक्षक म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
शॉन विल्यम्स यांनी २००८ ते २०१२ या काळात महाराष्ट्र क्रिकेट संघाचा हेड कोच म्हणून कार्यरत राहून संघाच्या कामगिरीत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघाने २०१० साली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी विजेतेपद मिळवून दिले होते, हा महाराष्ट्र संघासाठी ऐतिहासिक क्षण ठरला होता. त्याचबरोबर महाराष्ट्र संघ त्यांच्या नेतृत्वात रणजी ट्रॉफीत क्वार्टरफायनल पर्यंत पोहोचला होता. शिवाय, त्यांनी ऑस्ट्रेलियातील देशांतर्गत शेफिल्ड शील्ड स्पर्धेत कोचिंग युनिटचा एक भाग म्हणून काम करत आपल्या संघाला ही स्पर्धा जिंकण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
शॉन विल्यम्स यांची नियुक्ती केवळ संघाच्या सखोल प्रशिक्षण व दीर्घकालीन विकासापुरती मर्यादित राहणार नाही, तर त्याद्वारे महाराष्ट्र राज्यातील क्रिकेट प्रशिक्षकांना व्यावसायिकता व आधुनिक कोचिंग तंत्रज्ञान शिकवण्याचा व धोरणात्मक प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याचा विशेष फोकस महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ठेवणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र क्रिकेट संघाचे तंत्र, प्रशिक्षण पद्धती व व्यवस्थापन अधिक प्रगत व आधुनिक पद्धतीने कार्यरत होतील.
या प्रसंगी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी सांगितले की, “महाराष्ट्र क्रिकेटच्या सतत उन्नतीसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन नेहमी प्रयत्नशील राहिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज शॉन विल्यम्स यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या डायरेक्टर ऑफ क्रिकेटपदी निवड करण्यात आली आहे. शॉन विल्यम्स यांचा महाराष्ट्र क्रिकेटसोबतचा ट्रॅक रेकॉर्ड अत्यंत प्रभावी असून, त्यांच्या आंतरराष्ट्रीय अनुभवाचा व तज्ज्ञतेचा फायदा महाराष्ट्र क्रिकेट संघाला मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाची गुणवत्ता व सामर्थ्य अधिक बळकट होईल आणि महाराष्ट्र क्रिकेटची प्रतिष्ठा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक दृढ होईल. त्याचबरोबर, त्यांनी स्थापित केलेल्या व्यावसायिक कोचिंग कार्यक्रमांद्वारे राज्यातील प्रशिक्षकांचे कौशल्य अधिक सशक्त करण्यात येईल, जे महाराष्ट्र क्रिकेटच्या दीर्घकालीन यशासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल.”
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सर्व स्तरांवरून शॉन विल्यम्स यांचे हार्दिक स्वागत करण्यात येत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र क्रिकेट संघ नवीन शिखर गाठेल, अशी पूर्ण आशा व्यक्त करण्यात येत आहे.