
दुलीप ट्रॉफी फायनल
बंगळुरू ः यश राठोड (नाबाद १३७) आणि कर्णधार रजत पाटीदार (१०१) यांच्या शानदार शतकांच्या बळावर सेंट्रल झोन संघाने साऊथ झोन संघावर २३५ धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱया दिवसाचा खेळ थांबला तेव्हा सेंट्रल झोन संघाने पाच बाद ३८४ धावसंख्या उभारली आहे.
सेंट्रल झोनतर्फे दानिश मालेवार (५३), अक्षय वाडकर (२२), शुभम शर्मा (६) हे आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले. त्यानंतर कर्णधार रजत पाटीदार व यश राठोड या जोडीने चौथ्या विकेटसाठी १६७ धावांची भागीदारी करुन संघाची स्थिती भक्कम केली. रजत पाटीदार याने ११५ चेंडूत १०१ धावांची दमदार शतकी खेळी साकारली.

या शतकी खेळीत त्याने १२ चौकार व २ षटकार मारले. त्यानंतर यश राठोड याने सारांश जैन याच्यासमवेत सहाव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करुन संघाच्या आघाडीत भक्कम वाढ केली. यश राठोड याने नाबाद १३७ धावा फटकावल्या आहेत. त्याने ११ चौकार व १ षटकार मारला. गोलंदाजीत पाच विकेट घेणारा सारांश जैन याने फलंदाजीतही आपली चमक दाखवली. त्याने शानदार ४७ धावा केल्या आहेत.
दुसऱया दिवशीचा खेळ थांबला तेव्हा यश राठोड १३७ धावांवर आणि सारांश जैन ४७ धावांवर खेळत होते. सेंट्रल झोन संघाने १०४ षटकांत पाच बाद ३८४ धावा काढल्या आहेत. दक्षिण विभागाकडून गुर्जपनीत सिंग याने ७४ धावांत तीन गडी बाद केले आहेत.