
डी ११ टी २० लीग क्रिकेट ः शतकवीर आदित्य राजहंस, बिलाल पटेल सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः डी स्पोर्ट्स प्रेझेंट्स डी ११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यात लकी क्रिकेट क्लब संघाने एमजीएम क्रिकेट अकादमी संघावर सहा विकेट राखून विजय साकारला. दुसऱया सामन्यात इम्रान पटेल २२ नाबाद संघाने झैनब सहारा संघाचा १२४ धावांनी पराभव केला. यात बिलाल पटेल आणि आदित्य राजहंस यांनी सामनावीर पुरस्कार पटकावला.

रुफीट क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा खेळवण्यात येत आहे. पहिल्या सामन्यात एमजीएम क्रिकेट अकादमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकात सात बाद १३२ धावसंख्या उभारली. त्यानंतर या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना लकी क्रिकेट क्लब संघाने ११.५ षटकात चार बाद १३३ धावा फटकावत सहा विकेट राखून दणदणीत विजय साकारला. बिलाल पटेल याने सामनावीर पुरस्कार मिळवला.
या सामन्यात रामेश्वर दौड यान ४५ चेंडूत ४५ धावांची खेळी केली. त्याने चार चौकार व एक षटकार मारला. अक्षय बनकर याने ३२ चेंडूत ४३ धावा फटकावल्या. त्याने पाच चौकार व एक षटकार मारल. जुनेद पटेल याने अवघ्या १० चेंडूंत ४२ धावांची स्फोटक खेळी केली. त्याने एक चौकार आणि सहा टोलेजंग षटकार ठोकले. गोलंदाजीत बिलाल पटेल याने १४ धावांत तीन विकेट घेऊन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. समर्थ पुरी याने १४ धावांत दोन बळी घेतले. सामीउद्दिन सय्यद याने १३ धावांत एक गडी बाद केला.
झैनब सहारा संघ पराभूत
दुसऱया सामन्यात इम्रान पटेल २२ नाबाद या संघाने स्फोटक फलंदाजी करत २० षटकात तीन बाद २६९ असा धावांचा डोंगर उभारुन सामन्यावर वर्चस्व गाजवले. प्रत्युतरात झैनब सहारा संघ २० षटकात सर्वबाद १४५ धावा काढू शकला. इम्रान पटेल संघाने तब्बल १२४ धावांनी हा सामना जिंकला. आदित्य राजहंस हा सामनावीर ठरला.

या सामन्यात आदित्य राजहंस याने अवघ्या ५६ चेंडूत १२० धावांची तुफानी शतकी खेळी साकारली. त्याने सात उत्तुंग षटकार व १३ चौकार ठोकत शतक साजरे केले. शुभम हरकळ याने तीन षटकार व सात चौकारांसह २० चेंडूत ५२ धावा काढल्या. योगेश चौधरी याने ३३ धावांचे योगदान दिले. त्याने तीन चौकार व दोन षटकार मारले. गोलंदाजीत इम्रान (३-४५), समीर बेग (२-८), साई चौधरी (२-३४) यांनी प्रभावी कामगिरी बजावली.