खेळ खेळणं आणि जपणं काळाची गरज – आमदार अरूण लाड

  • By admin
  • September 12, 2025
  • 0
  • 23 Views
Spread the love

सोलापूर ः शारीरिक व मानसिक आरोग्य, शरीर आणि गुणवत्ता घडवण्यासाठी व सामाजिक कौशल्ये विकसित करण्यासाठी खेळ खेळणे व एखादा खेळ जपणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार अरुण लाड यांनी येथे केले.

सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, थोर स्वातंत्र्यसेनानी,  सी व्ही तथा बापूसाहेब झपके ४४ वा स्मृती समारोह पुरूषांच्या निमंत्रित राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार डॉ बाबासाहेब देशमुख हे होते. या प्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक विनोद घुगे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते शत्रुघ्न गोखले, बास्केटबॉल ॲम्युचर असोसिएशनचे सचिव एम शेफी, उच्च शिक्षण मंडळ अध्यक्ष बाबुराव गायकवाड, माजी नगराध्यक्ष सुहास होनराव, उद्योजक विलास क्षीरसागर, माऊली तेली, नागेश तेली, माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे, विश्वास पवार कुंडल, विद्यामंदिर परिवारातील सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास प्रमुख पाहुणे आमदार अरुण लाड यांचे हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थित मैदानाचे विधिवत पूजन करून उद्घाटन संपन्न झाले.

या प्रसंगी पुढे बोलताना आमदार लाड  म्हणाले स्वातंत्र्यसैनिक गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या नावाने त्यांच्या स्मृती समारोहानिमित्त निमित्त गेली ४३ वर्षे सुरू असलेल्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा व यावर्षीपासूनच्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेमधील शिस्तबद्धता पाहता बास्केटबॉल हा खेळ प्रकार खरोखर या संस्थेने जपला आहे हे पाहून मनस्वी आनंद होत आहे. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार डॉ बाबासाहेब देशमुख म्हणाले १९५२ रोजी गुरुवर्य बापूसाहेब झपके यांनी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर होत आहे यामध्ये प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे व याच संस्थेच्या मैदानात जागतिक स्तरावरील खेळाची राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली जात आहे याचा मनस्वी आनंद आहे. महात्मा गांधी, साने गुरुजी यांचे विचार रुजविणाऱ्या झपके  कुटुंबीयसमवेत स्नेह आहे असे सांगत‌. बास्केटबॉल खेळासाठी व या मैदानासाठी शासननिधी पूर्ततेसाठी प्रयत्न करणार असे सांगितले.

यावेळी  उपविभागीय पोलिस अधिकारी मंगळवेढा बसवराज शिवपुजे म्हणाले गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या बास्केटबॉल सामन्यात ग्रामीण भागातील विविध खेळाडू निर्माण होत आहेत ही महत्त्वपूर्ण गोष्ट आहे.

या उद्घाटन सोहळ्यासाठी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत, संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके आदी क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थाध्यक्ष प्रा प्रबुद्धचंद्र झपके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा धनाजी चव्हाण यांनी केले. प्राचार्य अमोल गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले‌.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *