
दुबई : आशिया कप टी २० क्रिकेट स्पर्धेत पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाने ओमान संघाचा ९३ धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. आता येत्या रविवारी पाकिस्तानचा सामना भारतीय संघाशी होणार आहे.
पाकिस्तान संघाला १६० धावसंख्येवर रोखल्यानंतर ओमान संघ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. मात्र, पाकिस्तानच्या प्रभावी फिरकी व वेगवान माऱ्यासमोर ओमान संघाचा डाव अक्षरश: गडगडला. ओमान संघाकडून हम्माद मिर्झा याने सर्वाधिक २७ धावा काढल्या. त्याने तीन चौकार व ेएक षटकार मारला. आमिर कलीमने १३ धावा फटकावल्या. तळाच्या शकील अहमदने १० धावांचे योगदान दिले. यांचा अपवाद वगळता ओमानचा एकही फलंदाज धावांचा दुहेरी आकडा गाठू शकला नाही. ओमानचा डाव १६.४ षटकात ६७ धावांत गडगडला.
फहीम अशरफ (२-६), सुफियान मुकीम (२-७), सैम अयुब (२-८) यांनी अचूक मारा करत प्रत्येकी दोन गडी बाद केले. शाहीन आफ्रिदी (१-२०), अबरार अहमद (१-१२), मोहम्मद नवाज (१-१३) यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
पाकिस्तानचा डाव
पाकिस्तान संघाची सुरुवात खराब झाली. पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर सैम अयुबला शाह फैसलने एलबीडब्ल्यू केले. तो खाते देखील उघडू शकला नाही. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद हॅरिसने साहिबजादा फरहानसोबत जबाबदारी सांभाळली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६३ चेंडूत ८५ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी आमिर कलीम याने मोडली. त्याने सलामीवीर फरहानला त्याच्याच चेंडूवर झेलबाद केले. २९ चेंडूत २९ धावा काढून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. यादरम्यान मोहम्मद हॅरिसने टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. ४३ चेंडूत ६६ धावा काढून तो बाद झाला. यादरम्यान त्याच्या बॅटमधून सात चौकार आणि तीन षटकार निघाले. हॅरिसला आमिर कलीम याने क्लीन बोल्ड केले.
कलीमने १३ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कर्णधार सलमान आगाला हम्माद मिर्झाने झेलबाद केले. तो खाते उघडू शकला नाही. हसन नवाजच्या रूपात संघाला पाचवा धक्का बसला. शाह फैसलने त्याला हसनैनने झेलबाद केले. तो फक्त नऊ धावा करू शकला. शाह फैसलने पाकिस्तानला सहावा धक्का दिला. त्याने मोहम्मद नवाजला आपला बळी बनवले. तो १९ धावा काढून बाद झाला. त्यानंतर फहीम अश्रफ आठ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. फखर जमान २३ धावा काढून नाबाद राहिला आणि शाहीन शाह आफ्रिदी दोन धावा काढून नाबाद राहिला. ओमानकडून शाह फैसल आणि आमिर कलीमने प्रत्येकी तीन बळी घेतले. त्याच वेळी मोहम्मद नदीमने एक बळी घेतला.