
मुंबईत हॉटेल ताज पॅलेसमध्ये संपन्न झाला सोहळा
मुंबई ः जळगाव येथील प्रख्यात जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन यांना विवेकानंद इंटरनॅशनल रिलेशन्स पीस अवार्ड मुंबई येथील हॉटेल ताजमहाल पॅलेसच्या सभागृहात भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
मुंबई येथील चक्र व्हिजन इंडिया फाऊंडेशनच्या वतीने आयोजित दिमाखदार पुरस्कार सोहळ्यात कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान, शाश्वत विकास, देशाच्या विकासात आर्थिक योगदान तसेच मानवतावादी कार्य या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून, ज्यांनी देशाची सीमा ओलांडून जागतिक कल्याण व प्रगती घडवली आहे अशा व्यक्तींना गौरविण्यात येते. दरवर्षी जगातील १० पेक्षा अधिक देशांत आपले कार्य प्रस्थापित केलेल्या भारतीय उद्योगांना विवेकानंद इंटरनॅशनल रिलेशन्स पीस अवार्ड देऊन सन्मानित करण्यात येते.
अशोक जैन यांच्यासह अम्रीता विश्व विद्यापीठाच्या कुलगुरू माता अम्रीता नंदमयीजी, भारत फोर्जचे चेअरमन बाबा कल्याणी, युपीएल ग्रुपचे चेयरमन विक्रम श्राॅफ, गोदरेज इंडस्ट्रीजचे चेअरमन नादिर गोदरेज, पिडीलाईट इंडस्ट्रीजचे चेयरमन मधुकर पारख, व्हाॅकार्डचे चेअरमन डॉ हुजेफा खोराकीवाला, क्युके टेक्नाॅलाॅजीचे चेअरमन मनीष झावर, सीईजी ग्रुपचे कार्यकारी संचालक विश्वास जैन, सुहाना मसालाचे संचालक विशाल चोरडीया यांनाही त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गतवर्षी टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते .
कार्यक्रमास पद्मविभूषण व पद्मभूषण डाॅ मनमोहन शर्मा हे प्रमुख अतिथी होते. अशोक जैन यांना भारतीय सैन्यातील वरिष्ठ अधिकारी लेफ्टनन्ट जनरल अरुण अनंथानारायणन, प्रसिद्ध चित्रपट अभिनेते जॅकी श्रॉफ, पद्मश्री डॉ जी डी यादव, रवी अय्यर , वीर अवॉर्ड चे संयोजक गगन मल्होत्रा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी जैन इरिगेशन चे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन ही उपस्थित होते.