
रत्नागिरी ः जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत डेरवण क्रीडा संकुल (एसव्हीजेसीटी), तालुका चिपळूण व रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा उत्साहात पार पडली.
या स्पर्धेत १४ वर्षे, १७ वर्षे व १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींचा सहभाग होता. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून निवड चाचणीतून प्रथम क्रमांक पटकावलेले खेळाडू या स्पर्धेत उतरले. विजेत्या खेळाडूंना कोल्हापूर विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.
उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून आहारतज्ञ डॉ ऋषिकेश चुणेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे गणेश जगताप उपस्थित होते. तक्रार निवारण समितीत जिल्हा संघटनेचे सचिव लक्ष्मण कररा, शशांक घडशी, कोषाध्यक्ष विश्व दास लोखंडे, उपाध्यक्ष भरत कररा, पंचप्रमुख यांनी काम पाहिले.
कार्यक्रम प्रसंगी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष व राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष व्यंकटेश्वरराव कररा यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. एसव्हीजेसीटी क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर व सर्व ट्रस्टींनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानण्यात आले. जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे आणि तालुका क्रीडा अधिकारी गणेश जगताप यांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण झाली.