
पुण्यातील स्पोर्ट्स विस्टा फाऊंडेशनतर्फे मदतीचा हात
पुणे ः लहान वयापासूनच मुलांच्या आवडीनुसार योग्य दिशेने योग्य प्रयत्न करण्यात आले तर निश्चितच यशस्वी खेळाडू घडू शकतो हे लक्षात घेत पुण्यातील स्पोर्ट्स विस्टा फाऊंडेशनच्या वतीने १० ते १६ वर्षे वयोगटातील गरजू आणि उदयोन्मुख टेबल टेनिस खेळाडूंना स्पोर्ट्स विस्टा मासिक शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे. योजने अंतर्गत कोलकता येथील अंकोलिका चक्रबर्ती व श्रीओश्री चक्रबर्ती या दोघींना ही शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे.
शिवछत्रपती पुरस्कार विजेते, माजी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू व राष्ट्रीय प्रशिक्षक सुनील बाब्रस, त्यांची पत्नी व माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू सुजाता बाब्रस, माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू व शिवछत्रपती पुरस्कार विजेते अनिकेत कोपरकर हे स्पोर्ट्सविस्टा ट्रस्टचे संस्थापक आहेत.

या योजनेच्या पहिल्या लाभार्थी असलेल्या अंकोलिका चक्रबर्ती ही १५ वर्षाखालील मुलींमध्ये भारतात पहिल्या तर जगात सर्वोत्तम २० खेळाडूंपैकी एक आहे. कोलकत्यामधील नैहाती भागातून त्या येत असून त्यांची संपूर्ण जबाबदारी एकल पालक असलेल्या तिच्या आईवर आहे. १५ वर्षाखालील गटात आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिल्या ५ खेळाडूंमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या स्वप्नांना या शिष्यवृत्ती योजनेमुळे निश्चितच बळ मिळेल. याबरोबरच श्रीओश्री चक्रबर्ती ही १३ वर्षाखालील वयोगटातील खेळाडू असून आज भारतात मुलींमध्ये ती पहिल्या स्थानावर आहे.

माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक सौम्यदीप रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली डीडीएसपी अकादमीमध्ये ती प्रशिक्षण घेत असून तिचे पालक मध्यम सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतून येतात. श्रीओश्री हिचे आंतरराष्ट्रीय मानांकन सुधारण्याबरोबरच १५ वर्षाखालील मुलींच्या भारतीय संघात स्थान मिळवून आंतरराष्ट्रीय पदके जिंकण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्याचा फाऊंडेशनचा उद्देश आहे.
या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत खेळाडूंना दरमहा दहा ते पंधरा हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दोन खेळाडूंची निवड करण्यात आली असून लवकरच आणखी चार ते सहा खेळाडूंना अशी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. स्पोर्ट्स विस्टा फाऊंडेशनच्या माध्यमातून पुढील २ ते ३ वर्षांत प्रतिवर्षी किमान ८ खेळाडूंना आर्थिक मदत केली जाणार आहे.