पुण्यात शारीरिक शिक्षण संचालक महासंघाचे सत्याग्रह आंदोलन

  • By admin
  • September 13, 2025
  • 0
  • 23 Views
Spread the love

पुणे ः नेट-सेट पीएचडी संघर्ष समिती आयोजित धरणे आंदोलनात सहभागी होऊन महाराष्ट्र राज्य वरिष्ठ महाविद्यालयीन शारीरिक शिक्षण संचालक महासंघाने अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील २०१७ नंतरच्या प्राध्यापक संवर्गातील ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक यांची १०० टक्के पदे भरती केली जावीत. या मागणीसाठी उच्च शिक्षण संचालकांच्या पुणे येथील कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन केले.

या सत्याग्रह आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील शारीरिक शिक्षण संचालक, क्रीडाप्रेमी, प्राध्यापक आणि महाविद्यालयात काम करणारे ग्रंथपाल आणि ग्रंथालय कर्मचारी सहभागी झाले होते.

शारीरिक शिक्षण संचालक आणि ग्रंथपाल ही महाविद्यालय स्तरावरील प्राचार्य पदाच्या खालोखाल अत्यंत महत्त्वाची पदे असून या पदांना तासिका तत्वाचे धोरण लागू न करता ही पदे प्राधान्याने आणि तात्काळ भरावीत अशी या महासंघाची मागणी आहे.

२५ मार्च २०२३ रोजी महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने या पदांच्या भरतीचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. त्यात २०१७ पर्यंतच्या रिक्त पदांच्या भरतीला मान्यता देण्यात आली आहे. तथापि २०१७ पासून अद्यापही वरिष्ठ महाविद्यालयातील ही पदे रिक्तच आहेत. त्यामुळे क्रीडा विभाग आणि ग्रंथालय कामकाजात अनेक अडथळे येत आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० लागू करण्यात आले असून युवा पिढीला गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास शासन कटिबद्ध असल्याचे सातत्याने सांगण्यात येते. मात्र राज्यातील अनेक महाविद्यालयात शारीरिक शिक्षण संचालक आणि ग्रंथपाल ही पदे दीर्घकाळ रिक्त राहिल्याने शासनाचा उद्देश वास्तवात येण्यात अनेक अडचणी येत आहेत. याची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी सत्याग्रह आंदोलकांनी शासनाकडे केली आहे.

महाविद्यालयातील प्राचार्य पद ज्या पद्धतीने भरले जाते त्याच पद्धतीने शारीरिक शिक्षण संचालक आणि ग्रंथपाल ही पदे भरण्यास शासनाने विनाअट परवानगी द्यावी अशी महासंघाची अपेक्षा आहे.

महाराष्ट्र राज्य वरिष्ठ महाविद्यालयीन शारीरिक शिक्षण संचालक महासंघाने याबाबतचे तपशीलवार निवेदन शिक्षण संचालनालय पुणे यांना दिले आहे. शारीरिक शिक्षण संचालक डॉ गणेश सिंहासने, प्रा तायाप्पा शेंडगे यांनी ही पदे तात्काळ भरण्याची मागणी केली आहे. यावेळी सदर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ शारीरिक शिक्षण संचालक प्रा एन डी बनसोडे, डॉ दीपक डांगे पाटील, डॉ महेंद्र कदम, डॉ समीर पवार, डॉ विक्रांत सुपुगडे, डॉ रोहित पाटील, डॉ अमर तुपे यांसह अनेक सहकारी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *