
नवी दिल्ली ः भारताची अव्वल पुरुष दुहेरी जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचे हाँगकाँग ओपन सुपर ५०० विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. रविवारी खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात चीनच्या ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या लियांग वेई केंग आणि वांग चांग जोडीविरुद्धच्या कठीण लढतीनंतर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
जागतिक क्रमवारीत ९ व्या क्रमांकाच्या भारतीय जोडीने सुरुवातीचा सामना जिंकून आघाडी घेतली, परंतु त्यानंतर २१-१९, १४-२१, १७-२१ असा पराभव पत्करावा लागला. ही रोमांचक अंतिम फेरी ६१ मिनिटे चालली. सात्विक आणि चिराग १६ महिन्यांत पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचले. गेल्या वेळी त्यांनी थायलंड ओपनचे विजेतेपद जिंकले होते. तथापि, या पराभवासोबतच सुपर ५०० फायनलमध्ये १०० टक्के विजयाचा त्यांचा विक्रमही मोडला. आतापर्यंत त्यांनी खेळलेल्या चारही सुपर ५०० फायनल जिंकल्या होत्या.

सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने या हंगामात ६ उपांत्य फेरीतील सामने गमावल्यानंतर पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यापूर्वी, लियांग वेई केंग आणि वांग चांग यांच्याविरुद्ध त्यांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड ३-६ होता. त्यांनी पॅरिस वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये या चिनी जोडीला हरवले होते, परंतु यावेळी त्यांना आघाडी राखता आली नाही.