
धुळे ः महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशनच्यातर्फे मुंबई प्रियदर्शनी पार्क क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या २३ वर्षांखालील महाराष्ट्र राज्यस्तरीय ज्युनियर अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत धुळे जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचा खेळाडू प्रथमेश देवरे याने ८०० मीटर धावणे प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक प्राप्त केले.
तसेच रोशन माळी याने १५०० मीटर धावणे या प्रकारात रौप्य पदक प्राप्त केले. अनिकेत धनगर, विश्वजीत देवरे व प्रथमेश देवरे व शैलेश पावरा यांनी रिले ४ बाय ४०० रिले धावणे प्रकारात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक प्राप्त केले.
या शानदार कामगिरीबद्दल धुळे जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, सचिव प्रा. नरेंद्र पाटील, कोषाध्यक्ष हेमंत भदाणे, विश्वास पाटील, सुखदेव महाले, प्रमोद पाटील यांनी पदक प्राप्त खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.