
ठाणे ः गोव्याच्या मिरामार येथील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या क्रीडा संकुलात नुकत्याच पश्चिम विभागीय आंतर राज्य सांघिक व वैयक्तिक बॅडमिंटन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र व यजमान गोवा संघाने भाग घेतला. आंतर राज्य बॅडमिंटन स्पर्धेत ठाण्याच्या खेळाडूंनी आपला दबदबा कायम ठेवत घवघवीत यश संपादन केले आहे.
बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या अंतर्गत झालेल्या या पश्चिम विभागीय स्पर्धेचे आयोजन गोवा राज्य बॅडमिंटन संघटनेने केले होते. ही स्पर्धा ज्युनिअर व सिनिअर गटात खेळवली गेली. महाराष्ट्राच्या संघात ठाण्याच्या अनघा करंदीकर व सिया सिंग, अदिती गावडे, सानिध्य एकाडे, आर्यन बिराजदार, अर्जुन बिराजदार, सर्वेश यादव या खेळाडूंचा समावेश आहे.
ठाणेकर सानिध्य एकाडे याने अदिती गावडे हिच्या साथीने ज्युनिअर मिश्र दुहेरी गटामध्ये सुवर्ण पदक मिळवून आपली राष्ट्रीय स्पर्धेतील प्रवेशिका निश्चित केली. त्यांनी अंतिम फेरीत दिव्यांश अग्रवाल व इशिका पोद्दार (छत्तीसगड) यांचा २१-१६,२१-८ असा सरळ दोन सेट मध्ये पराभव केला. ठाणेकर सर्वेश यादव याचा समावेश असणाऱ्या महाराष्ट्र पुरुष संघाने अंतिम फेरीत छत्तीसगड संघाचा पराभव केला आणि सुवर्णपदक पटकावले.
अर्जुन बिराजदार व आर्यन बिराजदार या ठाणेकर जोडीने ज्युनिअर मुलांच्या संघात दोन रौप्य पदके मिळवली. प्रथम सांघिक स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ छत्तीसगड संघाकडून अंतिम फेरीत पराभूत झाल्यामुळे त्यांना सांघिक रौप्य पदक मिळाले. तर वैयक्तिक स्पर्धेतही दिव्यांश अग्रवाल व सौरव साहू या छत्तीसगडच्या जोडीकडून अंतिम फेरीत १३-२१,२१-१६,१९-२१ अशा प्रमाणे पराभूत झाल्याने त्यांना दुसऱ्या रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
महिलांच्या दुहेरी मध्ये ठाणेकर जोडी अनघा करंदीकर आणि सिया सिंग वैयक्तिक अंतिम फेरीत ऐश्वर्या मेहता व प्रियांका पंत (मध्यप्रदेश) यांच्याकडून १६-२१,२१-७,१५-२१ अशा तीन सेटमध्ये पराभूत झाल्या व त्यांनीही रौप्य पदकाची कमाई केली. अशा तऱ्हेने या प्रतिष्ठापूर्ण स्पर्धेत ठाणेकरांनी दोन सुवर्ण व चार रौप्य पदके मिळवून आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला.
ठाणे महापालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेच्या या खेळाडूंचे प्रमुख प्रशिक्षक श्रीकांत वाड व सर्व प्रशिक्षकांनी अभिनंदन केले आहे. व त्यांना आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.