
छत्रपती संभाजीनगर ः मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित देवगिरी महाविद्यालयातील वाणिज्य विभाग अंतर्गत रियल टेक्नॉलॉजी सेंटरचे संस्थापक इंजिनीयर संजय सिंघानिया यांचे “ऍडव्हान्स कॉम्प्युटराइझ अकाउंटिंग” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य डॉ गणेश मोहिते, तर विशेष उपस्थिती म्हणून वाणिज्य विभाग प्रमुख डॉ आर बी लहाने हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ राजेश लहाने यांनी केले. ते म्हणाले की, या स्पर्धेच्या युगामध्ये वाणिज्य विद्याशाखेत टॅली विषयातील कौशल्य प्राप्त करणे कसे आवश्यक आहे या विषयीचे महत्व विद्यार्थ्यांना त्यांनी पटवून दिले.
प्रमुख व्याख्याते संजय सिंघानिया यांनी ॲडव्हान्स कॉम्प्युटर अकाउंटिंगमध्ये कॉस्ट सेंटर, बिल वाईस डिटेल, बॅच वाईस एन्ट्री, स्टॉक जर्नल (गोडाऊन टू गोडाऊन ट्रान्सफर), मॅन्युफॅक्चरिंग जर्नल व जीएसटी यावर प्रात्यक्षिक स्वरूपात अगदी सहज आणि सोप्या भाषेमध्ये माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ गणेश मोहिते यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपामध्ये या स्पर्धेच्या युगामध्ये ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीला कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कशाप्रकारे रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत यावर त्यांनी उदाहरणासहित आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी वाणिज्य शाखेतील ११० विद्यार्थी उपस्थित होते. या व्याख्यानाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक तेजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ डी व्ही जावळे यांनी केले. डॉ कैलास ठोंबरे यांनी आभार मानले.