
राष्ट्रीय स्पर्धेसाठी १७ खेळाडू ठरले पात्र
छत्रपती संभाजीनगर ः गोवा येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतर राज्य बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी राहिली. महाराष्ट्राचा पुरूष एकेरी संघ आणि १९ वर्षांखालील मुलींचा संघ या स्पर्धेत अजिंक्य ठरला आहे. तसेच महाराष्ट्राचे १७ खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत पात्र ठरले आहेत.
पणजी-गोवा येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतरराज्य बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करून राज्याचा झेंडा उंचावला. वरिष्ठ पुरुष संघ आणि महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या संघाने अंतिम फेरीत छत्तीसगड संघाचा पराभव करून विभागीय विजेतेपद जिंकले आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. याशिवाय, महाराष्ट्रातील १७ खेळाडू वैयक्तिक गटात राष्ट्रीय स्पर्धेत पात्र ठरले आणि राज्याच्या यशात भर घातली.

वरिष्ठ पुरुष संघात संकल्प गुराला, वरुण कपूर, सर्वेश यादव, दर्शन पुजारी, आर्या ठाकोर, ध्रुव ठाकोर, बिप्लव कुवळे, विराज कुवळे, अभ्युदय चौधरी, अजिंक्य पाथरकर यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत चॅम्पियनशिप पटकावली. तर छत्तीसगड संघाचा वर्षांखालील मुलींच्या संघाचा ९-३ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. युतिका चव्हाण, रिद्धिमा सरपते, प्रकृती शर्मा, तारिणी सुरी, श्रावणी वाळेकर, अदिती गावडे, राधा गाडगीळ यांनी छत्तीसगड राज्याच्या मुलींचा २-१ असा पराभव करून राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रासाठी विजेतेपद पटकावले.
वरिष्ठ महिला संघ आणि १९ वर्षांखालील मुलांच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. वैयक्तिक स्पर्धेत, तारिणी सुरी / श्रावणी वालेकर यांनी १९ वर्षांखालील मुलींच्या दुहेरीत, सानिध्या एकाडे / अदिती गावडे यांनी १९ वर्षांखालील मिश्र दुहेरीत, आर्या ठाकोर / ध्रुव ठाकोर यांनी पुरुष दुहेरीत, अनघा करंदीकर / सिया सिंग – महिला दुहेरीत आणि अजिंक्य पाथरकर / निकिता जोसेफ यांनी मिश्र दुहेरीत विजय मिळवला आणि मुलांच्या १९ वर्षांखालील गटात अर्जुन बिराजदार / आर्यन बिराजदार यांनी उपविजेतेपद पटकावले.
या स्पर्धेसाठी मंगरीश पालेकर, संयोगिता घोरपडे यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले, तर प्रसाद गोखले यांनी संघ व्यवस्थापक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने असोसिएशनचे अध्यक्ष अरुण लखानी, उपाध्यक्ष शिरीष बोराळकर, सचिव सिद्धार्थ पाटील यांनी खेळाडू, पालक, प्रशिक्षक, निवड समिती आणि जिल्हा संघटनांचे अभिनंदन केले आहे आणि त्यांना आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत आणि असोसिएशनच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.