
पुणे ः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयाला भेट दिली. ही भेट केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर संपूर्ण महाविद्यालयासाठी एक अविस्मरणीय आणि प्रेरणादायी क्षण ठरली.
या दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमांची पाहणी केली. विशेषतः, क्विक हिल फाउंडेशनच्या सहकार्याने सुरू असलेल्या सायबर सिक्युरिटी उपक्रमाला त्यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. तसेच या उपक्रमाचे कार्यकर्ते सुरेश आण्णा घुले यांनीही विशेष कौतुक केले.
भेटीदरम्यान उपमुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या डिजिटल युगात सायबर सुरक्षेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यांनी सायबर सिक्युरिटी टीमच्या कार्याची प्रशंसा केली आणि या उपक्रमाची गरज अधोरेखित केली. उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. “आजचे विद्यार्थीच देशाचे भविष्य आहेत आणि अशा उपक्रमांमुळेच ते भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज होतील,” असे त्यांनी सांगितले.
या भेटीदरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ प्रशांत मुळे, संगणक विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ विलास वाणी, प्राध्यापिका मनीषा गाडेकर तसेच इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांनी सायबर सिक्युरिटी टीममधील विद्यार्थी तेजस दळवी, आश्लेषा दामगुडे, प्रणव तळेकर, यश भराटे, नेहा विश्वासे, अपूर्वा वाळके, आदित्य बेल्हेकर, प्रणाली शिंदे, अवधूत मोरे, पायल पठारे, अंकिता माने, अहन दगडे आणि अक्षय चोपडे यांच्याशी संवाद साधून त्यांना पुढील कार्यासाठी प्रोत्साहन दिले. ही भेट विद्यार्थ्यांमध्ये एक नवा उत्साह निर्माण करणारी ठरली आहे.