
डेरवण ः डेरवण येथे झालेल्या शालेय तालुका कबड्डी स्पर्धेत तब्बल १०६८ खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेतील ही विक्रमी सहभाग संख्या ठरली आहे.
एसव्हीजेसीटी क्रीडा संकुलात शालेय तालुका कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये १४ वर्षाखालील मुलांमध्ये १७ संघ आणि मुलींमध्ये १२ संघ, १७ वर्षाखालील मुलांमध्ये ३० संघ आणि १४ वर्षाखालील मुलींमध्ये एकूण १२ संघ तसेच १९ वर्षाखालील मुलांमध्ये १२ संघ आणि १९ वर्षाखालील मुलींमध्ये एकूण ६ संघ अशा एकूण ८९ संघांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेतील सहभागी खेळाडूंची विक्रमी संख्या यावर्षी तब्बल १०६८ झाली.
तसेच स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी चिपळूणचे डीवायएसपी प्रकाश बेले यांनी स्पर्धेला भेट दिली. त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. येथील स्पर्धा पावसातही होतात याची चर्चा ऐकूनच मी स्पर्धेला भेट दिली. या स्पर्धा बंदिस्त क्रीडांगणात जल्लोषात संपन्न झाल्या. चिपळूण तालुक्यातील खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवून अनेक रसिकांची मने जिंकली व अतिशय उत्तम खेळाचे प्रदर्शन केले. तसेच स्पर्धेच्या अंतिम दिवशी माजी कृषिमंत्री व विद्यमान आमदार सदाभाऊ खोत यांनी क्रीडा संकुलास भेट दिली व खेळाडूंचे अभिनंदन केले.
या स्पर्धेचे उद्घाटन एसडबल्यूसीटी ट्रस्टचे व्यवस्थापक प्रतिक मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी चिपळूण तालुका शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष राकेश खांडेकर, चिपळूण तालुका क्रीडा समन्वयक समीर कालेकर, क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, क्रीडा शिक्षक मोहसीन पटेल, रोहित गमरे, उल्हास मोहिते, जीवनराज कांबळे, जीवन पाटील, महेश सावंत, आशिष कानापडे, राजश्री टकले आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलांमध्ये गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे संघाने अंतिम सामन्यात सुमन विद्यालय, टेरव संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. तसेच युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण संघाने तृतीय क्रमांक पटकावला.
१४ वर्षाखालील मुलींमध्ये न्यू इंग्लिश स्कूल खेर्डी, सती संघाने अंतिम युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले आणि व्ही एस देसाई माध्यमिक विद्यालय, असुर्डे संघाने तृतीय क्रमांक पटकाविला.
१७ वर्षाखालील मुलांमध्ये मोहन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, आकले आणि जनता माध्य विद्यालय, कोकरे यांच्यात झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात मोहन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, आकले या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. तर गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे संघाने तृतीय क्रमांक पटकाविला.
१७ वर्षाखालील मुलींमध्ये युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण आणि गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे यांच्यात झालेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण संघ विजयी ठरला. तर सुमन विद्यालय, टेरव संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला.
१९ वर्षांखालील मुलांमध्ये झालेल्या रोमहर्षक अंतिम सामन्यात न्यू इंग्लिश स्कूल खेर्डी, सती संघ विजेते पदाचा मानकरी ठरला. तर गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डे संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला आणि एम ए आगवेकर महाविद्यालय, अलोरे संघाने तृतीय क्रमांक पटकाविला.
१९ वर्षाखालील मुलींच्या अंतिम सामन्यात आनंद पवार कॉलेज, चिपळूण संघाने न्यू इंग्लिश स्कूल खेर्डी, सती संघावर रोमहर्षक विजय मिळवून विजेतेपद पटकाविले. तसेच डी बी जे कॉलेज, चिपळूण संघाने तृतीय क्रमांक पटकाविला.