
नंदुरबार ः महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित आंतर जिल्हा क्रिकेट सामन्यांमध्ये नंदुरबार क्रिकेट असोसिएशनच्या १५ वर्षे वयोगटातील संघात एसएनडी क्रिकेट अकॅडमीची तृप्ती पगारे हिची निवड झाली आहे.
विशेष म्हणजे येवला शहरातील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली तृप्ती पगारे ही पहिलीच महिला खेळाडू ठरली असून हा बहुमान तिने आपल्या कठोर परिश्रमाने मिळवला आहे. तृप्ती पगारे हिचे वडील संदीप पगारे यांचे स्वप्न आहे की ती एक यशस्वी खेळाडू व्हावी. हे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून ते अहोरात्र तिच्या सोबत मेहनत घेत आहे.
तृप्ती पगारेच्या या यशामागे तिची स्वतःची मेहनत, वडिलांचा त्याग व प्रयत्न तसेच एसएनडी क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक अमोल गायकवाड यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले आहे.
तृप्तीच्या या यशाबद्दल सुनील पैठणकर, एसएनडी सीबीएसई स्कूलच्या प्राचार्या प्राची पटेल व पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या शितल महाजन यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नंदुरबार क्रिकेट संघटनेकडून सिद्धार्थ रोकडे हे प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत.