
सांगली ः आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू श्रेया हिप्पारागी हिला सांगली येथे पद्मभूषण वसंतदादा पाटील जिल्हा क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
श्रेया हिप्पारागी हिने वयाच्या सहाव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली आणि अनेक राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत. तसेच भारताचा ध्वज उंचावला आहे. तिच्या शानदार कामगिरीची दखल घेत प्राथमिक शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषद सांगली यांनी तिला २०२३-२४ आणि २४-२५ या वर्षांसाठी पद्मभूषण डॉ वसंतदादा पाटील जिल्हा क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले आहे. या पुरस्कारात प्रमाणपत्र, ट्रॉफी आणि चाळीस हजार रोख रक्कम समाविष्ट आहे.
पुरस्कार वितरण समारंभाला सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल दादा पाटील, सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, सांगली जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे आणि सुभाष पाटील यांची उपस्थिती होती.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर श्रेया म्हणाली की, “हा पुरस्कार मिळाल्याने तिला खूप आनंद होत आहे. यामुळे तिच्या कामगिरीला आणखी प्रोत्साहन मिळाले आहे आणि मी माझ्या कामगिरीवर अधिक लक्ष केंद्रित करेल.” या संदर्भात एक विशेष गोष्ट म्हणजे हा क्रीडा पुरस्कार बुद्धिबळ खेळासाठीचा पहिला पुरस्कार आहे. तसेच, श्रेया हा पुरस्कार संपादन करणारी सर्वात तरुण खेळाडू आहे.
या पुरस्कार मिळाल्याबद्दल तिचे चिंतामणी लिमये, चिदंबर कोटीभास्कर, स्मिता केळकर, प्रा सीमा कठमाळे, माधुरी कात्रे, फिडे पंच दीपक वायचळ, गिरीश चितळे, चंद्रकांत वळवडे, विजयकुमार माने, पौर्णिमा उपळावीकर-माने, डॉ अभिजीत चव्हाण, अजितकुमार कोळी, सचिन हरोले, ईश्वरी जगदाळे, आदित्य चव्हाण, विक्रमादित्य चव्हाण, श्रेयस पुरोहित यांनी तिचे अभिनंदन केले आहे.