
पुणे ः पुण्याची आंतरराष्ट्रीय खेळाडू नैशा रेवसकर तिने नवी दिल्ली येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत पंधरा वर्षाखालील मुलींच्या गटात विजेतेपद पटकाविले.
राष्ट्रीय टेबल टेनिस संघटनेतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नैशा तिने अंतिम सामन्यात पश्चिम बंगालची खेळाडू अहोना रॉय हिचा पराभव केला. अतिशय चुरशीने झालेल्या या सामन्यात तिने ८-११,११-६,१४ -१२,२-११,११-९ असा विजय मिळविला. तिने आक्रमक खेळाचा सुरेख प्रत्यय घडविला. उपांत्य सामन्यात तिने पश्चिम बंगालच्याच श्रीजनी चक्रवर्ती हिच्यावर ११-६,११-२,११-८ अशी सलग तीन गेम्स मध्ये मात केली होती.
नैशा हिने आजपर्यंत अखिल भारतीय स्तरावर अनेक स्पर्धांमध्ये पदकांची कमाई केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही तिने चमक दाखवली आहे. ती नीरज होनप यांच्या मार्गदर्शनाखाली एम्स अकादमीत प्रशिक्षण घेत आहे.