
देवगिरी महाविद्यालयात आयोजन
छत्रपती संभाजीनगर ः मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, देवगिरी महाविद्यालय येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून वर्तमान काळातील तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल व व्हाट्सअप सारख्या सोशल मीडियाच्या युगामध्ये आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांची ग्रंथाच्या माध्यमातून यशोगाथा वाचता यावी. तसेच आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याची जाणीव जागृती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास विद्यार्थ्यांच्या परिचयाचा व्हावा या उदात्त हेतूने ग्रंथालय व ज्ञान संसाधन केंद्रा मार्फत देवगिरी महाविद्यालयाच्या ग्रंथालय परिसरात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन देवगिरी महाविद्यालय विकास समितीचे ज्येष्ठ सदस्य पंडितराव हर्षे, उपाध्यक्ष शेख सलीम शेख अहमद यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ अशोक तेजनकर हे होते. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ रवी पाटील, उपप्राचार्य डॉ गणेश मोहिते, उपप्राचार्या डॉ अपर्णा तावरे, ग्रंथपाल डॉ सुदेश डोंगरे, डॉ सोनल देशमुख, डॉ उज्ज्वला मगरे व ग्रंथालयीन कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
उदघाटन प्रसंगी शेख सलीम शेख अहमद म्हणाले की, भारताला मिळालेले स्वातंत्र्य हे अत्यंत पराकोटीच्या संघर्षातून मिळाले आहे. आपल्या स्वातंत्र्याला मोठा त्यागाचा आणि बलिदानाचा इतिहास आहे. जगावर राज्य करणाऱ्या महाशक्तीने भारतावर कब्जा मिळवला होता. यातून मुक्ततेचा इतिहास म्हणजे भारतीय स्वातंत्र्य होय. असाच संघर्ष निजामशाही राजवटीतून मुक्त होण्यासाठी मराठवाड्यालाही करावा लागला यामुळे आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य आपण जपले पाहिजे व ते टिकविण्यासाठी आजच्या मोबाईल व व्हॉट्सअप मीडियाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांची ग्रंथ गाथा वाचता यावी व स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवण्यासाठी जागरूक व्हावे या उद्देशाने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी जीवनात समृद्धता व विकास करायचा असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात शिकत असताना वेळेचा सदुपयोग वाचनासाठी करावा, कारण वाचाल तर वाचाल ! अशीच भूमिका आपणास घ्यावी लागेल. ग्रंथ हे जीवन जगण्यासाठी दिशा दाखवितात असे प्रतिपादन देवगिरी महाविद्यालयात ग्रंथालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ अशोक तेजनकर यांनी केले.