सोलापूरच्या ओवी शिंदे व साक्षी कांबळे यांना तिसरा क्रमांक, पश्चिम महाराष्ट्रात सलोनी पाटील तर पुणे महानगरात मंजरी धोंडियाल प्रथम
पुणे ः क्रीडा भारती संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय क्रीडा ज्ञान परीक्षेत मध्य प्रदेशातील आर्यन गौरने प्रथम क्रमांकासह एक लाख रुपयांचे पारितोषिक जिंकले. अलंग देव (उत्तर प्रदेश) व यशराज सिंग राजपूत (गुजरात) यांना द्वितीय क्रमांकाचे प्रत्येकी ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
सोलापूरच्या ओवी शिंदे व साक्षी कांबळे तसेच भावना सिंघवी (मध्य प्रदेश), आयुष राज (उत्तराखंड), वंश गुप्ता (उत्तर प्रदेश), कशिश राणा (उत्तर प्रदेश) यांनी संयुक्तरित्या तिसरे स्थान मिळवले त्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात सेवासदन पुणे संस्थेच्या सलोनी पाटील हिने प्रथम क्रमांक पटकाविला तर पुणे महानगर विभागात गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलच्या मंजरी धोंडियाल हिने प्रथम स्थान मिळवले.
तसेच देशातील ११ विभागांमध्ये प्रत्येकी ११ हजार रुपयांचे प्रादेशिक पुरस्कार दिले जाणार आहेत. क्रीडा भारतीचा ऑनलाईन क्रीडा ज्ञान परीक्षा २०२५ हा नाविन्यपूर्ण उपक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. आपल्या देशात क्रीडा संस्कृती निर्माण करण्यासाठी आणि अधिकाधिक तरुणांना खेळांशी जोडण्याच्या उद्देशाने क्रीडा भारती १९९२ पासून कार्यरत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी ही ऑनलाइन परीक्षाही घेते. ओपन बुक फॉरमॅट असलेली ही परीक्षा केवळ आव्हानात्मकच नाही तर मनोरंजक देखील आहे. या परीक्षेचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही संपूर्ण कुटुंब एकत्र बसून किंवा मित्रांसह सुद्धा एकत्र बसून परीक्षा देऊ शकता.
राज चौधरी यांनी परीक्षेची पार्श्वभूमी आणि क्रीडा भारतीची भूमिका स्पष्ट केली आणि कश्यप, सैनी, प्रसाद यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वर्षी देशातील तरुणांना जास्तीत जास्त सहभाग घेण्याचे आवाहन केले. परीक्षा समन्वयक विजय राजपूत यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.