
यूएई संघाचा ४१ धावांनी पराभव; शाहीन आफ्रिदीची अष्टपैलू कामगिरी
दुबई : आशिया कप क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात सर्वात नाट्यमय ठरलेल्या सामन्यात पाकिस्तान संघाने यूएई संघाचा ४१ धावांनी पराभव करत स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवले. सामन्यापूर्वी बहिष्काराचे अस्त्र उगारलेल्या पाकिस्तानला लवकरच या भूमिकेतून माघार घ्यावी लागली आणि मैदानात उतरावे लागले. सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना आयसीसीने कायम ठेवून पाकिस्तानला मोठा इशारा दिला. या विजयानंतर पाकिस्तानने सुपर फोरसाठी आपले स्थान निश्चित केले.
यूएई संघासमोर विजयासाठी १४७ धावांचे आव्हान होते. मात्र, यूएई संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. अलिशान शराफू (१२), मुहम्मद वसीम (१४), मुहम्मद जोहैब (४) हे आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. त्यानंतर यूएई संघ सामन्यात परतू शकला नाही.
या सामन्यात सर्वाधिक ३५ धावा काढलेला राहुल चोप्रा, ध्रुव पारासऱ्ख (२०) यांनी थोडी झुंज देण्याचा प्रयत्न केला. आसिफ खान (०), हर्षित कौशिक (०) हे धावांचे खाते उघडू शकला नाहीत. सिमरनजीत सिंग (१), मुहम्मद रोहिद खान (२) हे धावबाद झाले. यूएई संघ १७.४ षटकात अवघ्या १०५ धावांत सर्वबाद झाला. पाकिस्तानने ४१ धावांनी सामना जिंकला. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी (२-१६), हरिस रौफ (२-१९), अबरार अहमद (२-१३) यांच्या घातक गोलंदाजीसमोर यूएई संघाचा टिकाव लागू शकला नाही.
पाकिस्तानची खराब सुरुवात
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत यूएईसाठी १४७ धावांचे लक्ष्य ठेवले. साहिबजादा फरहान, सैम अयुब आणि कर्णधार सलमान अली आघा यांच्यासह पाकिस्तानचे टॉप-ऑर्डर फलंदाज सर्व अपयशी ठरले. एकमेव पाकिस्तानी फलंदाज फखर जमानने अर्धशतक झळकावले आणि शाहीन आफ्रिदीने शेवटी धमाकेदार खेळी केली. सामन्यापूर्वी झालेल्या गोंधळानंतर, पाकिस्तानच्या फलंदाजीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा अभिमान धुळीस मिळवला असेल.
यूएईने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाचा कर्णधार मोहम्मद वसीमचा हा निर्णय मोठ्या प्रमाणात संघाच्या बाजूने कामी आला. पाकिस्तानने डावाच्या पहिल्याच षटकात त्यांचा सलामीचा फलंदाज सैम अयुब गमावला. फलंदाज पुन्हा एकदा शून्यावर बाद झाला. पाकिस्तानने ९ धावांवर आपला दुसरा बळी गमावला. त्यानंतर फखर झमानने अर्धशतक झळकावले आणि ३६ चेंडूत ५० धावा केल्या.
पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा यांनी २७ चेंडूत २० धावा केल्या आणि टी-२० मध्ये ७४ च्या स्ट्राईक रेटने खेळले. त्यानंतर एकामागून एक विकेट पडल्या. अखेर शाहीन आफ्रिदीने १४ चेंडूत २९ धावा केल्या, त्यात तीन चौकार आणि दोन षटकार मारले.
नाट्यमय घडामोडी
पाकिस्तान क्रिकेट संघाने धमकी देत यूएईविरुद्ध खेळणार नसल्याचे जाहीर केले. पाकिस्तान संघाने वेळेवर हॉटेल सोडले नाही. त्यामुळे पाकिस्तान आणि यूएई यांच्यातील सामना एक तास उशीरा सुरू झाला. पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी पाकिस्तान संघाला स्टेडियममध्ये येण्याचे निर्देश दिल्याने ही कोंडी सुटली. आयसीसीने सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना कायम ठेवले. पाकिस्तानने त्यांना काढून टाकण्यासाठी मोठा दबाव आणला. परंतु, आयसीसीने त्यांना कायम ठेवून पाकिस्तानला खेळण्याकरिता मैदानात उतरवले. या प्रकरणात पाकिस्तानची जगभरात मोठी नाचक्की झाली.