
अमरावती (तुषार देशमुख) ः देवास (मध्य प्रदेश) येथे नुकतीच आशियाई डॉजबॉल स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंची निवड चाचणी घेण्यात आली. ही आशियाई डाॅजबाॅल स्पर्धा चिबा (जपान) येथे २५ ते ३० सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.
या स्पर्धेसाठी भारतीय डाॅजबाॅल संघात महाराष्ट्रातील पाच दिग्गज खेळाडू आशिष जगताप (बीड), शरद बडे (धाराशिव), विनायक सपकाळ (जळगाव), प्रतीक अलिबागकर (पुणे) व प्रथमेश गायकवाड यांचा समावेश आहे. हे पाचही खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. याआधीही अमरावतीच्या दोन खेळाडूंनी महिला आंतरराष्ट्रीय डाॅजबाॅल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यात स्वामिनी लुंगे व शीतल पोरे या दोघींचा समावेश आहे.
या सर्व अंतराष्ट्रीय खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्राचार्य डॉ हनुमंत लुंगे यांनी नुकतेच अमरावती येथे मार्गदर्शन करून खेळातील बारकाव्यांबाबत इत्थंभूत माहिती दिली. तसेच या खेळाडूंना तांत्रिकदृष्ट्या आणखी मजबूत करण्यात आले. जेणेकरून आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळताना त्यांच्याकडून कमी चुका व्हाव्यात तसेच संघाला जास्तीत जास्त गुण मिळावेत. या आंतरराष्ट्रीय डॉजबॉल खेळाडूंचा सत्कार समारंभ एम. टी. बालवडकर ज्युनियर कॉलेज पुणे येथे झाला.
या प्रसंगी श्री खंडेराय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तसेच नवनियुक्त पुणे जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे अध्यक्ष गणपत बालवडकर तसेच महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे महासचिव प्राचार्य डॉ हनुमंत लुंगे, प्राचार्य एम टी बालवडकर ज्युनियर कॉलेज पुण्याचे डफळ, पुणे जिल्हा सचिव अमन दोमाले, मुकेश पवार, राजेंद्र मागाडे, दीपक कात्रे, महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश जाधव, डॉ हरीश काळे, कैलास करवंदे, अतुल पडोळे, डॉ तुषार देशमुख आदींनी अभिनंदन केले आहे.