ओपन नॅशनल पिकलबॉल स्पर्धेत महेश परदेशीला विजेतेपद

  • By admin
  • September 18, 2025
  • 0
  • 51 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः नागपूर येथे विदर्भ पिकलबॉल संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ओपन नॅशनल पिकलबॉल स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या महेश परदेशी याने विजेतेपद पटकावले.

या स्पर्धेत महेश परदेशी याने ३५ प्लस वयोगटात शानदार कामगिरी नोंदवत जेतेपद संपादन केले. केंद्रीय मंत्री नितीन गडगरी यांच्या हस्ते महेश परदेशी याला पारितोषिक प्रदान करण्यात आले.

या स्पर्धेत महेश परदेशी याने शानदार खेळाचे प्रदर्शन केले. त्याने देशाच्या विविध भागातून आलेल्या खेळाडूंसमोर आपल्या तांत्रिक खेळाचे आकर्षक प्रदर्शन केले आणि प्रतिस्पर्ध्यांना कोणतीही संधी न देता महेश परदेशी याने विजेतेपद संपादन केले.

या स्पर्धेत भारताच्या विविध राज्यातून खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यात महेश परदेशी याने मध्य प्रदेश, बिहार, मुंबई, नागपूर येथून आलेल्या खेळाडूंवर मात करत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात महेशने पुण्याच्या खेळाडूस १५ – ८ असे पराभूत करत विजेतेपद पटकावले.

महेश परदेशी याने राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावल्याने पिकलबॉल या लोकप्रिय असलेल्या खेळात ही कामगिरी नवा इतिहास रचणारी ठरली आहे. या विजयाने त्यांचे प्रतिस्पर्धक व सर्वत्र कौतुक होत आहे.

स्पर्धेच्या समारोप प्रसंगी महेश परदेशी म्हणाला की, हा विजय माझ्या कठोर मेहनत आणि प्रशिक्षणाची पावती आहे. पिकलबॉल एक मनोरंजक आणि उत्साही खेळ आहे आणि मी अजून अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्यात प्राविण्य मिळवू इच्छित आहे.

पिकलबॉलच्या या उंचीवर महेश परदेशी यांचे पुढील लक्ष्य जागतिक स्तरावर स्पर्धा जिंकणे आहे. त्यासाठी ते कठोर सराव करत आहेत आणि आपल्या कौशल्यात आणखी सुधारणा करण्याचे ठरवले आहे.

या शानदार कामगिरीबद्दल पालकमंत्री संजय शिरसाठ, माजी महापौर विकास जैन, यांनी महेश परदेशीचे अभिनंदन केले आहे. तसेच पिकलबॉल असोसिएशनचे निलेश राऊत, दिनेश वंजारे, रेखा कुरिल, सरोज परदेशी, ज्वाला रगडे, छाया कालिके, शिखा श्रीवास्तव, हेमंत पातूरकर, डॉ शत्रूंजय कोटे, डॉ मकरंद जोशी, डॉ श्रीनिवास मोतीयेळे, डॉ शशिकांत सिंग, डॉ संदीप जगताप, डॉ उदय डोंगरे, पंकज भारसाकळे यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *