
छत्रपती संभाजीनगर ः महानगरपालिका हद्दीतील आंतरशालेय खो-खो स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला आहे. १४ वर्षांखालील गटात ११६ (मुले-मुली) संघांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे स्पर्धेत मोठी चुरस निर्माण झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत आंतरशालेय खो-खो स्पर्धेचे आयोजन धर्मवीर संभाजी विद्यालयात करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी १४ वर्षांखालील गटाच्या मुला-मुलींच्या संघानी सहभाग घेतला. यंदा अंडर १४ गटात सहभागी संघांनी शतक पार केले. ही या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा सहभाग ठरला आहे. यात मुलांच्या ६४ तर मुलींच्या ५२ संघांनी सहभाग नोंदवला आहे.
धर्मवीर संभाजी विद्यालयात भारतीय खो-खो संघटनेचे कोषाध्यक्ष गोविंद शर्मा, जिल्हा संघटनेचे सचिव विकास सूर्यवंशी, पंडित दीनदयाल संस्थेचे सहसचिव शिवाजीराव पाटील दांडगे, मुख्याध्यापक लक्ष्मण मेमाणे, मनपा क्रीडा अधिकारी संजीव बालय्या, राजेश पाटील आदी उपस्थित होते. क्रीडा विभाग प्रमुख विनायक राऊत यांनी उपस्थित यांचे स्वागत करून स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला.