
पुणे ः पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे जिल्हास्तर शालेय बॉक्सिंग स्पर्धेला (१७ वर्षे मुले व मुली) गुरुवारी प्रारंभ झाला. जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम, भवानी पेठ येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष अविनाश बागवे यांच्या हस्ते झाले. उद्घाटन सोहळ्यास पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष भरतकुमार व्हावळ, उपाध्यक्ष कृष्णदेव क्षीरसागर, कुणाल राजगुरू, शिवछत्रपती पुरस्कार विजेते विजय यादव, राष्ट्रीय तांत्रिक अधिकारी अजित ओसवाल, पुणे शहर संघटनेचे उपाध्यक्ष जीवनलाल निंदाने, पुणे शहर बॉक्सिंग संघटना सचिव विजय गुजर, तसेच पुरंदर तालुका संघटनेचे कार्याध्यक्ष विनोद कुंजीर, राष्ट्रीय खेळाडू विशाल गव्हाणे, ऑफिशियल मनोज यादव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे महासचिव अभिमन्यू सुर्यवंशी यांनी केले.
या स्पर्धेत पुणे ग्रामीण भागातील तब्बल ७६ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. यावेळी नुकतीच नोएडा येथे झालेल्या बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित राष्ट्रीय तांत्रिक अधिकारी परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाल्याबद्दल अजित ओसवाल यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या जिल्हास्तर स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंची निवड येत्या २२ ते २३ सप्टेंबर रोजी पुणे येथे होणाऱ्या विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे.