दमदार विजयासह श्रीलंका सुपर ४ मध्ये 

  • By admin
  • September 18, 2025
  • 0
  • 3 Views
Spread the love

शेवटच्या षटकात पाच षटकार ठोकणाऱ्या नबीची खेळी व्यर्थ 

अबू धाबी : मोहम्मद नबीच्या शेवटच्या षटकातील पाच षटकारांमुळे अफगाणिस्तान संघाने १६९ धावसंख्या उभारुन सामन्यातील रंगत कायम ठेवली. परंतु, श्रीलंका संघाने शानदार फलंदाजी करुन सहा विकेटने विजय नोंदवला. श्रीलंकेच्या या विजयाने अफगाणिस्तानचे आव्हान संपुष्टात आले. या गटातून बांगलादेश संघ सुपर ४ मध्ये सामील झाला आहे.

श्रीलंकेच्या डावाची सुरुवात खराब झाली. पथुम निस्सांका (६), कामिल मिशारा (४) हे स्वस्तात बाद झाले. कुसल परेरा तीन चौकारांसह २८ धावा फटकावून बाद झाला. चरिथ असलंका (१७) याने १२ चेंडूत दोन चौकारांसह एक आक्रमक खेळी केली. रशीद खानने त्याचा अप्रतिम झेल टिपला. 

कुसल मेंडिस व कामिंडू मेंडिस या जोडीने शानदार फलंदाजी करुन संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. कुसल मेंडिसने आक्रमक अर्धशतक ठोकले. त्याने ५२ चेंडूत नाबाद ७४ धावा काढल्या. त्यात त्याने दहा चौकार मारले. कुसलला सुरेख साथ देत कामिंडू मेंडिसने नाबाद २६ धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. श्रीलंका संघाने १८.४ षटकात चार बाद १७१ धावा फटकावत सहा विकेटने सामना जिंकला. 

मोहम्मद नबीची वादळी फलंदाजी

अफगाणिस्तानने सुरुवातीला विकेट गमावल्या. श्रीलंकेने ७९ धावांवर सहा विकेट गमावल्या. त्यानंतर कर्णधार रशीद खान आणि मोहम्मद नबी यांनी ३५ धावांची भागीदारी करत डाव सावरला.

१८ व्या षटकाच्या अखेरीस मोहम्मद नबीने १० चेंडूत फक्त १४ धावा केल्या होत्या. त्यानंतर, १९ व्या षटकात, नबीने षटकाच्या पहिल्या तीन चेंडूत तीन चौकार मारले. १९ व्या षटकात, नबीने नूर अहमदसह १७ धावा जोडल्या. दरम्यान, २० व्या षटकात, श्रीलंकेचे गोलंदाज मोहम्मद नबीला रोखू शकले नाहीत, ज्याने डावाच्या शेवटच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी सलग पाच षटकार मारले.

श्रीलंकेने २० व्या षटकात ३२ धावा दिल्या. शेवटच्या षटकाच्या सुरुवातीला मोहम्मद नबी स्ट्राईकवर होता. पहिल्या तीन चेंडूत तीन षटकार मारले गेले आणि त्यानंतर एक नो-बॉल लागला. त्यानंतर नबीने चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर षटकार मारले. सर्वांना अपेक्षा होती की तो सहा चेंडूत सहा षटकार मारेल, पण तो शेवटचा चेंडू चुकला.या षटकात नबीने पाच षटकार ठोकून सामन्यातील रोमांच कायम ठेवला. सहा बाद ७९  अशा खराब स्थितीतून अफगाणिस्तानने २० षटकात आठ बाद १६९ धावसंख्या उभारली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *