
नागपूर ः जिल्हा क्रीडा परिषद नागपूर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा आंतर शालेय व्हॉलिबॉल स्पर्धेत नागपूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मॉन्टफोर्ट स्कूलच्या १४ वर्षांखालील मुलांच्या व मुलींच्या दोन्ही संघाने उत्कृष्ट कामगिरी नोंदवत दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.
बनारसीदास रुईया हायस्कूल काटोल येथे नुकत्याच पार पडलेल्या या स्पर्धेतील मुलांच्या चुरशीच्या अंतिम सामन्यात नागपूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मॉन्टफोर्ट स्कूल संघाने काटोल तालुक्याचा १५-११, १३-१५, १५-१३ अशा तीन सेट मध्ये पराभव करीत प्रथम क्रमांक प्राप्त केला. तत्पूर्वी, या संघाने कळमेश्वर व नरखेड तालुक्यांच्या संघांना सरळ दोन सेटमध्ये नमवत अंतिम फेरित प्रवेश केला होता.
१४ वर्षांखालील मुलींच्या अंतिम सामन्यात मॉन्टफोर्ट स्कूल नागपूरच्या मुलींच्या अनुभवी संघाने यजमान काटोल संघावर १५-१२, १५-१३ अशा गुणांनी मात करीत आपले प्रभुत्व सिद्ध केले व विजेतेपद प्राप्त केले.
मॉन्टफोर्ट स्कूलच्या मुलांच्या संघातील पार्थ तोडकर, शर्विल नारनवरे, भावेश पराते, मयंक चौधरी, पार्थ ढेंगे व अर्णव पडोले आणि मुलींच्या संघात अमेया राव, वंशिका लांडगे, इशिका वंजारी, अद्विता कोरे, पाखी बांगरे, जीविका तेलरांधे या खेळाडूंचा समावेश आहे आणि या खेळाडूंनी अष्टपैलू प्रदर्शन करीत आपल्या संघाला यश मिळवून दिले.
दोन्ही विजयी संघ आता विभागीय व्हॉलिबॉल स्पर्धेत नागपुर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. संघाच्या या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य ब्रदर जोमोन जॉय, उप-प्राचार्य ब्रदर जोस ईमानुएल व क्रीडा विभाग प्रमुख सुरेंद्र उगले यांनी दोन्ही विजयी संघांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना प्रशिक्षक योगेश राव व क्रीडा शिक्षिका उषा डूडी यांचे मार्गदर्शन लाभले.