
सांगली ः श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीच्या राष्ट्रीय खेळाडूंचा जिल्हा क्रीडा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सलग चार वर्षात नऊ पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत हे विशेष.
महाराष्ट्र शासन, प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सांगली यांच्यामार्फत दिला जाणारा पद्मभूषण डॉ वसंतदादा पाटील जिल्हा क्रीडा पुरस्कार यावर्षी अकॅडमीच्या राष्ट्रीय वुशू खेळाडू तेजस्विनी विजय पाटील व सोनाली जाधव यांना सांगली जिल्हा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार विशाल पाटील, शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड यांच्या हस्ते प्रमाणपत्र, चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
आतापर्यंत श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीच्या नऊ खेळाडूंना जिल्हा क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून २०२२ साली एकाच वेळी तीन पुरस्कार मिळवून हॅट्रिक साधणारे पहिलेच गुरुकुल व सलग चार वर्षात नऊ पुरस्कार मिळवून सांगली जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राचे लक्ष वेधून घेणारे एकमेव श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी म्हणून आज महाराष्ट्रभर नावलौकिक होत आहे.
सांगली जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी, शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड, विशाल नरवाडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ताताई कोरे, आशाताई पाटील, क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, क्रीडा मार्गदर्शक प्रशांत पवार या मान्यवरांच्या हस्ते सर्व खेळाडूंना गौरवण्यात आले आहे.