
छत्रपती संभाजीनगर : शहरातील प्रसिद्ध समाज सेवक आणि श्री शिवाजी हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक पी जी निकम गुरुजी यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी शनिवारी (२० सप्टेंबर) अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर एन ६, सेंट्रल १ नाका स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी त्यांच्या अंत्ययात्रेत माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, राधाकृष्ण गायकवाड, द्वारकादास पाथ्रीकर तसेच शहरातील नामवंत व्यक्ती, शिक्षण क्षेत्रातील नामवंत व्यक्ती तसेच शिक्षक, कलाकार तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. माजी मंंत्री राजेंद्र दर्डा, तसेच माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी निकम गुरुजीच्या आठवणींना याप्रसंगी उजाळा दिला. त्यांच्या पश्चात दैनिक स्वरगंगाचे संपादक मंगेश निकम, महापालिकेचे माजी उपायुक्त रवींद्र निकम आणि मुलगी संंध्याताई चव्हाण,तसेच नातू असा मोठा परिवार आहे. निकम गुरुजी यांचा विद्यापीठ नामांतर आंदोलन, मराठवाडा विकास आंदोलनात सक्रीय सहभाग होता. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने ते दरवर्षी लोककला महोत्सवाचे आयोजन करीत असत. विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होणारे निकम गुरुजी यांची सर्वत्र ओळख होती.