
वसंतराव नाईक महाविद्यालयात २८ सप्टेंबरला आयोजन
छत्रपती संभाजीनगर ः महा शस्त्रांग मार्शल आर्ट असोसिएशनतर्फे आणि शस्त्रांग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने राज्यस्तरीय रेफरी परीक्षेचे आयोजन २८ सप्टेंबर (रविवार) रोजी छत्रपती संभाजीनगर शहरात करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील वसंतराव नाईक महाविद्यालयात सकाळी नऊ ते पाच या वेळेत रेफरी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य सरचिटणीस मिलिंद काटमोरे यांनी दिली. काटमोरे म्हणाले की, शस्त्रांग मार्शल आर्ट या देशी खेळाचा शासनाच्या क्रीडा विभागाने १९ वर्षांखालील गटात समावेश केलेला आहे. शस्त्रांग मार्शल आर्ट या खेळात एअर शिल्ड, स्पीड ड्रील, पॅटर्न ड्रील, डिफेन्स ड्रील असे चार प्रकार आहेत. या इव्हेंटच्या माध्यमातून स्वतःचे आत्मसंरक्षण करणे, शारीरिक क्षमता वाढवणे, रेफरी परीक्षेची गुणांकन पद्धत, रेफ्रीचे काम कसे करावे या विषयी सेमिनारमध्ये प्रात्यक्षिक व परीक्षेच्या माध्यमातून शिकवले जाणार आहे. या सेमिनारसाठी एक हजार रुपये शुल्क असून जास्तीत जास्त जिल्ह्यातील प्रशिक्षक, क्रीडा शिक्षकांनी सहभाग नोंदवावा. अधिक माहितीसाठी पुरुषोत्तम खटके (९८८१६३०४८९, ९७६४७०३५५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य सचिव मिलिंद काटमोरे यांनी केले आहे.
या सेमिनार व वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन जिल्ह्यास संलग्नता पत्र देणे, यावर्षीच्या शालेय स्पर्धेचे नियोजन, तसेच संघटनेच्या राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन-नियोजन, विविध कमिट्या तयार करणे, शस्त्रांग मार्शल आर्टच्या बेल्ट ग्रेड परीक्षा, ब्लॅक बेल्ट परीक्षा, तसेच दहा दिवसांचे ट्रेनिंग सेमिनारचे आयोजन करणे या विषयांवर चर्चा होणार आहे.
तसेच अमरावती, वाशिम, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, जळगाव, पिंपरी चिंचवड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यात संलग्नता देण्यात येणार आहे. इच्छुक जिल्हा प्रतिनिधींनी मिलिंद काटमोरे (९८८१६३०४८९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य अध्यक्ष अॅड सोपानराव शेजवळ यांनी केले आहे.