
डी ११ टी २० लीग क्रिकेट ः आसिफ खान, प्रदीप निकम सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः डी स्पोर्ट्स प्रेझेंट्स डी ११ टी २० लीग क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात डीएफसी श्रावणी संघाने रायझिंग स्टार संघाचा ७२ धावांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात नाथ ड्रीप संघाने यंग इलेव्हनवर २० धावांनी विजय नोंदवला. या लढतींमध्ये आसिफ खान आणि प्रदीप निकम यांनी सामनावीर पुरस्कार संपादन केला.

रुफीट क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. डीएफसी श्रावणी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकात सात बाद २०५ अशी भक्कम धावसंख्या उभारुन सामन्यावर वर्चस्व गाजवले. रायझिंग स्टार संघाने २० षटकात आठ बाद १३३ धावा काढल्या. डीएफसी संघाने तब्बल ७२ धावांनी दणदणीत विजय साकारला.
या सामन्यात आसिफ खान (६९), खालिद झमान (६५), अभिषेक करडे (३८) यांनी स्फोटक फलंदाजी केली. आसिफने चार, खालिद याने दोन तर अभिषेकने दोन षटकार ठोकत मैदान गाजवले. गोलंदाजीत आकाश सोळुंके याने ३९ धावांत चार विकेट घेऊन आपला ठसा उमटवला. अमोल जाधव (३-४०), आसिफ खान (२-७) यांनी घातक गोलंदाजीचे प्रदर्शन केले.

यंग इलेव्हन पराभूत
दुसऱ्या सामन्यात नाथ ड्रीप संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात आठ बाद १४९ धावा काढल्या. प्रत्युत्तरात यंग इलेव्हन संघ १२९ धावांत सर्वबाद झाला. नाथ ड्रीपने २० धावांनी सामना जिंकत आगेकूच केली.
या सामन्यात अनिकेत काळे (४६), सुरज जाधव (४०) आणि विश्वजित राजपूत (३०) यांनी दमदार फलंदाजी केली. गोलंदाजीत प्रदीप निकम (४-१६) याने प्रभावी मारा करत चार विकेट घेऊन सामना गाजवला. ऋषिकेश तरडे (२-३६), शुभम वैद्य (२-२२), स्वप्नील चव्हाण (२-३१) यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.