
अभिषेक शर्मा-शुभमन गिलची धमाकेदार वादळी शतकी भागीदारी निर्णायक
दुबई ः अभिषेक शर्मा (74) आणि शुभमन गिल (47) यांच्या वादळी शतकी भागीदारीच्या बळावर भारतीय संघाने आशिया कप टी 20 क्रिकेट स्पर्धेत आपला दबदबा आणि वर्चस्व कायम ठेवत पाकिस्तान संघावर सहा विकेट राखून दणदणीत विजय नोंदवला. या स्पर्धेत भारताने दुसऱ्यांदा पाकिस्तान संघाला पराभूत केले आहे.

पाकिस्तान संघाने भारतीय संघासमोर विजयासाठी 172 धावांचे आव्हान ठेवले. या धावसंख्येचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल या सलामी जोडीने वादळी सुरुवात केली. गिल-अभिषेक जोडीने चौकार-षटकारांचा पाऊस पाडत पाकिस्तानी गोलंदाजांचा दणदणीत समाचार घेतला. अभिषेक शर्माने स्फोटक अर्धशतक ठोकले. त्याने अवघ्या 24 चेंडूत अर्धशतक साजरे केले. भारतीय खेळाडूकडून हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. अभिषेक शर्मा व शुाभमन गिल या जोडीने 9.5 षटकात 105 धावांची भागीदारी करुन संघाची स्थिती भक्कम केली. 10व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर फहीम अहमद याने शुभमन गिलला क्लीन बोल्ड बाद करुन भारताला पहिला धक्का दिला.

शुभमन गिल 28 चेंडूत 47 धावा काढून बाद झाला. त्याचे अर्धशतक अवघ्या तीन धावांनी हुकले. गिलने आपल्या आक्रमक खेळीत आठ खणखणीत चौकार मारले. गिल बाद झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव मैदानात उतरला. मात्र, सूर्यकुमार यादव षटकार मारण्याच्या प्रयत्नात एक खराब फटका मारुन बाद झाला. सूर्यकुमार यादव धावांचे खाते उघडू शकला नाही. हरिस रौफ याने सूर्याला बाद करुन भारताला दुसरा धक्का दिला. 106 धावांवर भारताची दुसरी विकेट पडली.
अभिषेक शर्मा याने आक्रमक फलंदाजी सुरू ठेवत धावगती वाढवली. अबरारला षटकार मारल्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात अभिषेक सीमारेषेवर झेलबाद झाला. अभिषेकने 74 धावांची शानदार खेळी केली. त्याने पाच उत्तुंग षटकार व सहा चौकार मारले. अभिषेकच्या तुफानी फलंदाजीने पाकिस्तान गोलंदाजी सैरभैर झाली होती.
शतकी भागीदारीनंतर एक वेळ बिनबाद 105 धावसंख्या असताना भारताची स्थिती तीन बाद 123 अशी झाली. त्यानंतर तिलक वर्मा व संजू सॅमसन या जोडीने 25 धावांची भागीदारी केली. 17व्या षटकात संजू 13 धावा काढून बाद झाला. रौफ याने त्याला क्लिन बोल्ड केले. त्यानंतर हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा यांनी 19व्या षटकात भारताला सहा विकेटने सामना जिंकून दिला. भारताने 18.5 षटकात चार बाद 174 धावा फटकावत शानदार विजयासह आपला दबदबा कायम ठेवला. तिलक वर्मा 30 तर हार्दिक पंड्या 7 धावांवर नाबाद राहिले.

अभिषेक शर्मा आणि हरिस रौफ यांच्यात वादावादी
या सामन्यात, अभिषेक शर्मा डावाच्या सुरुवातीपासूनच स्फोटक फलंदाजी केली. त्याने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीवर षटकार मारला. त्यानंतर, त्याने कोणत्याही गोलंदाजाला सोडले नाही आणि धमाकेदार वेगाने धावा काढल्या. भारताविरुद्धच्या डावातील पाचवे षटक हॅरिस रौफने टाकले. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शुभमन गिलने पुल शॉटसह चौकार मारला. पाकिस्तानी क्षेत्ररक्षकांना चेंडू पकडण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर हरिस रौफ भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माला काहीतरी म्हणतो आणि त्याच्यावर ओरडताना दिसतो. अभिषेक नंतर त्याला निघून जाण्याचा इशारा करतो. दोन्ही खेळाडू संतापलेले दिसतात. शुभमन गिल देखील त्याच्या जवळ येतो. त्यानंतर अभिषेक आणि रौफ यांच्यात हाणामारी होते. पंच येतात आणि हरिस रौफला दूर ढकलतात. स्टेडियममधील चाहते देखील ओरडतात. असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये अभिषेक हॅरिसला शिवीगाळ करताना दिसत आहे. पंचांनी हस्तक्षेप करुन हा प्रसंग हाताळला.

पाकिस्तानने उभारली १७१ धावसंख्या
प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने १७१ धावा केल्या. पाकिस्तानी संघाचा सर्वोत्तम फलंदाज साहिबजादा फरहान होता. त्याने ५८ धावा केल्या. त्याने अर्धशतक पूर्ण केल्यानंतरही तोफखान्याचा आनंद साजरा केला. या डावात भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण खूपच खराब होते. भारताने सातत्याने सोपे झेल सोडले. एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे जसप्रीत बुमराह हा भारताचा सर्वात महागडा गोलंदाज होता.
सॅम अयुब आणि साहिबजादा फरहान सहसा पाकिस्तानी संघासाठी डावाची सुरुवात करतो. परंतु या सामन्यात फखर जमानने अयुबची जागा घेतली. आतापर्यंतच्या तीनही आशिया कप सामन्यांमध्ये शून्यावर बाद झालेल्या अयुबने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि २१ धावांचे योगदान दिले.
साहिबजादा फरहान चमकला
या डावात साहिबजादा फरहान पाकिस्तानी संघाचा हिरो होता. त्याने ३४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने ४५ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकार मारत ४८ धावा केल्या. त्याने प्रथम सॅम अयुबसोबत ७२ धावांची भागीदारी केली आणि पाकिस्तानच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.
जसप्रीत बुमराह महागडा गोलंदाज
जसप्रीत बुमराहने त्याच्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये ४५ धावा दिल्या. पाकिस्तानविरुद्धच्या टी २० सामन्यात बुमराहने त्याच्या स्पेलमध्ये ४० पेक्षा जास्त धावा दिल्याची ही पहिलीच वेळ होती. हा त्याचा पाकिस्तान संधाविरुद्धचा सर्वात महागडा स्पेल होता.
पाकिस्तानच्या फलंदाजांनी शेवटच्या ३ षटकांमध्ये ४२ धावा जोडल्या. मोहम्मद नवाजने शेवटच्या षटकांमध्ये २१ धावा केल्या. कर्णधार सलमान आगा १७ धावांवर नाबाद राहिला, तर फहीम अशरफने ८ चेंडूत २० धावा काढल्या. त्याने त्याच्या डावात १ चौकार आणि २ षटकार मारले.
टीम इंडियाकडून शिवम दुबेने सर्वाधिक विकेट घेतल्या, दोन फलंदाजांना बाद केले. कुलदीप यादव आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी एक विकेट घेतली.
भारतीय संघात दोन बदल
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात दोन बदल करण्यात आले .त्यामध्ये जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांना पुन्हा संघात स्थान देण्यात आले.
कर्णधार सूर्याने हस्तांदोलन केले नाही
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेकीचा कौल जिंकला. परंतु, त्यानंतर सूर्याने पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आघाशी हस्तांदोलन केले नाही किंवा कोणत्याही संभाषणात सहभागी झाला नाही. दोन्ही कर्णधारांनी हात पाठीमागे ठेवून काही अंतरावर उभे राहिले. मागील सामन्यातही सूर्याने विरोधी कर्णधाराशी हस्तांदोलन केले नव्हते. मागील सामन्याची कहाणी आता पुनरावृत्ती झाली आहे.