
जळगाव ः भारतीय आट्यापाट्या महामंडळाच्या वतीने मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ३२ल्या मुले आणि २५ व्या मुली सब ज्युनियर गट राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने दोन्ही गटात वर्चस्व गाजवत विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.
या स्पर्धेत महाराष्ट्र मुले व मुलींच्या संघाने अंतिम सामन्यात पाँडिचेरी संघाच्या मुला /मुलींना २-० सेटने हरवत विजेतेपद प्राप्त केले. तन्मय डोळे (जळगाव) व आनंदी हरणे (अमरावती) यांनी नेतृत्व केले. महाराष्ट्र संघाचा तन्मय डोळे (जळगाव) व अक्षरा चिंचोलकर (अमरावती) हे स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू ठरले. राज्य स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणारे जळगावचे अनमोल तेलंग, निखिल पाटील, ओम गायकवाड व मुलींमधून रितिका महाजन, अमृता पवार यांनीही स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली व महाराष्ट्र संघाच्या यशाचे भागीदार ठरले. ज्येष्ठ क्रीडा संघटक प्रदीप तळवेलकर यांनी दोन्ही संघांचे अभिनंदन केले आहे.